वृत्तसंस्था/ म्युनिच
आयएसएसएफच्या येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज आर्या बोर्से आणि अर्जुन बबुता यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात आर्या आणि अर्जुन यांना चीनच्या स्पर्धकाकडून कडवा प्रतिकार झाला. पण भारताच्या या नेमबाजांनी चीनच्या वेंग आणि सेंग यांना 0.7 गुणांनी मागे टाकले. या नेमबाजी प्रकारातील पात्र फेरीत आर्या आणि अर्जुन यांनी 635.2 तर चीनच्या वेंग आणि सेंग यांनी 635.9 गुण नोंदविले होते. आर्या बोर्सेने 317.5 तर बबुताने 317.7 अशी कामगिरी वैयक्तिक गटात पात्र फेरीमध्ये केली होती. सुवर्णपदकासाठीच्या लढतीमध्ये बोर्से आणि बबुता यांनी चीनच्या झिफेई वेंग आणि लीहाओ सेंग यांचा 17-17 अशा गुणांनी पराभव केला. आयएसएसएफच्या पेरुतील लिमा येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोर्सेने रुद्रांक्ष पाटील समवेत 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात नॉर्वेच्या जिनेटी हेग आणि जॉन हेग यांनी कांस्यपदक मिळविले. म्युनिच स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 पदके मिळवली आहेत. सुरुची सिंगने यापूर्वी या स्पर्धेत सुवर्णपदक तर सिफ्ट कौर सामरा आणि इलाव्हेनिल यांनी वैयक्तिक नेमबाजी प्रकारात प्रत्येकी 1 कांस्यपदक घेतले आहे.