15 ते 19 जून दरम्यान तीन देशांना भेट देणार : जी-7 शिखर परिषदेलाही उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार, 15 जून रोजी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. 15 ते 19 जून दरम्यानच्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रथम सायप्रसला जातील. त्यानंतर ते कॅनडा आणि क्रोएशियाला जाणार आहेत. कॅनडामध्ये होणाऱ्या जी-7 परिषदेतही पंतप्रधान उपस्थित राहणार असून या परिषदेतील त्यांचे भाषण सहयोगी देशांसाठी नवी दिशा देणारे ठरणार आहे. जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक द्विपक्षीय बैठका देखील घेतील. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी पंतप्रधान मोदींच्या पाच दिवसांच्या आणि तीन देशांच्या दौऱ्याची अधिकृत माहिती दिली.
सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडे यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या दोन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसचा हा पहिलाच दौरा असेल. सायप्रसची राजधानी निकोसियामध्ये पंतप्रधान मोदी अध्यक्ष क्रिस्टोडौलिडे यांच्याशी चर्चा करतील. यादरम्यान, दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाईल. त्यानंतर लिमासोलमध्ये पंतप्रधान मोदी व्यावसायिक जगतातील वरिष्wठांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि भूमध्यसागरीय प्रदेश आणि युरोपियन युनियनशी भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेची पुष्टी होईल.
कॅनडातील जी-7 शिखर परिषदेत सहभाग
पंतप्रधान आपल्या विदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 16-17 जून रोजी कॅनडातील कनानास्किस येथे जी-7 शिखर परिषदेत सहभागी होतील. जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा हा सलग सहावा सहभाग असेल. या परिषदेत् पंतप्रधान मोदी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, एआय-ऊर्जा संबंध आणि क्वांटम आदी महत्त्वाच्या जागतिक मुद्यांवर जी-7 देशांचे नेते, इतर आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी विचारांची देवाणघेवाण करतील.