प्रयोगानुभव – सिनेमाचं ‘राज’वर्खी पान
Marathi June 15, 2025 12:25 PM

>> परागकण खॉट

विविध विषयांवरील एकापेक्षा एक अभ्यासपूर्ण तरीही मनोरंजक सांगीतिक कार्यक्रमांची निर्मिती करून रसिकांच्या मनावर गारुड करणाऱया चौरंग या संस्थेने भव्य, नेत्रदीपक आणि कलात्मक कार्यक्रमांची एक मोठी परंपरा निर्माण केली आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती ही संशोधन आणि सादरीकरण यांचा अद्भुत नमुना म्हणता येईल अशी असते. ‘मराठी बाणा’ हा त्यांचा ‘फायरब्रॅन्ड शो’ म्हणता येईल. मराठी वाङ्मय, मराठी संस्कृती, लोककला आणि संगीताचा एक नेटका आणि अभ्यासपूर्ण आविष्कार म्हणून मराठी बाणा कायम स्मरणात राहील. आता चौरंग त्यांचा नवाकोरा कार्यक्रम घेऊन आले आहेत. हिंदी सिनेसृष्टीचे शोमन असलेल्या राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘आवारा हूं’ हा कार्यक्रम प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी सिद्ध झाला आहे.

राज कपूर हे सिनेमाच्या इतिहासातील एक राजवर्खी पान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात बदलत्या सिनेमाची नवी परिभाषा लिहिणाऱया काही मोजक्या दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमाला एक नवे परिमाण दिले आणि त्यात राज कपूर हे एक प्रमुख नाव होते. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी आर. के. फिल्म्स या कंपनीची स्थापना करून चित्रपटांची निर्मिती करणाऱया राज कपूर यांनी अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमांनी भारताच्या सीमा ओलांडून परदेशातही अफाट लोकप्रियता मिळवली. सामाजिक प्रश्नांना हात घालणारे कलात्मक, संगीतमय चित्रपट निर्माण केले. नायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या राज यांना संगीताची वेगळी जाण होती आणि म्हणूनच त्यांच्या चित्रपटात संगीताला विशेष महत्त्व होते. शैलेंद्र, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन या रत्नांना पारखणारा राज हा खरा पारखी आणि या सगळ्यांना रातोरात प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आणणारा ‘बरसात’ हा आरकेचा दुसराच चित्रपट होता. सोबतच लता, मुकेश, के. ए. अब्बास, राधू कर्मकार, वसंत साठे अशी भरभक्कम टीम तयार करून आरके फिल्म्स नेहमीच अग्रणी राहिली. राज यांनी आरके फिल्म्सच्या बाहेरील सिनेमांतही नायक म्हणून काम केले आणि ते यशस्वी ठरले. राज यांचे आयुष्य वादळी होते. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आलेले चढउतार सर्वश्रुत आहेत. या सगळ्या गोष्टींचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘आवारा हूं’.

अशोक हांडे या हरहुन्नरी कलावंताने हा सगळा खेळ तपशीलवार मांडला आहे. लेखक, संशोधक, गायक, संगीतकार, दिग्दर्शक आणि निवेदक असणारे अशोक हांडे हे चौरंगचे सर्वेसर्वा आणि या कार्यक्रमाचे निर्माते आहेत. राज कपूर यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून अशोकजींनी ही निर्मिती केली असली तरी पुढील काही वर्षे हा कार्यक्रम यशस्वीपणे सादर होईल इतकी गुणवत्ता त्याच्यात निश्चित आहे. चौरंगच्या सर्व कार्यक्रमांना एक सूत्रधार असतो आणि तोच कार्यक्रम पुढे घेऊन जातो. अशोक हांडे त्यांच्या इतर कार्यक्रमांप्रमाणेच इथेही सूत्रधाराची भूमिका चोख बजावतात. त्यांची रसाळ वाणी ही विद्वत्तापूर्ण निवेदन आणि प्रासंगिक गायनाची जबाबदारी पार पाडते. राज कपूर यांच्या आयुष्यातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत असताना काही दुर्मीळ माहिती आणि याआधी न ऐकलेले किस्से गवसतात, त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन लाभतो आणि हे अशोक हांडे यांच्या लेखनाचे यश म्हणावे लागेल. गीत, संगीत आणि माहितीच्या जोडीने येणारी बहारदार नृत्ये कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतात. त्याची नृत्यरचना आणि प्रशिक्षित कलाकारांनी केलेले सादरीकरण डोळ्यांचे पारणे फेडणारे आणि एका वेगळ्या उंचीवर नेणारे आहे. नृत्य सादरीकरणात कलाकारांची भलीमोठी फौज भव्यता आणते. या सर्व प्रयत्नांत मोलाची भर घालतो तो रंगमंचावरील एलईडी क्रीन. कलावंतांच्या मागे पडद्यावर दिसणारी राज कपूर यांच्या चित्रपटांतील दृश्ये आणि गाणी यांच्यामुळे कार्यक्रमाला उठाव येतो.

अशोक हांडे यांच्या इतर काही कार्यक्रमांप्रमाणेच इथेही कलावंतांचा मोठा ताफा आहे. गायक, वादक, नर्तक आणि इतर मिळून सत्तरऐंशी जण आपल्या समोर हा अफलातून प्रयोग सादर करतात. त्यांचे synchronisation भन्नाट आहे आणि हे अशोक हांडे यांच्या दिग्दर्शनाचे कसब आहे. गायक असो वा निवेदक, प्रत्येकाचे पाठांतर चोख आहे. वादकही तयारच असतात आणि गाणे सुरू झाल्यावर अनपेक्षितपणे रंगमंचावर अवतरणारी नृत्ये लक्षवेधी ठरतात. एखाद्या नाटकाप्रमाणे या कार्यक्रमाला बंदिस्त पटकथा आहे आणि प्रत्येक पात्र हे आपापल्या भूमिका चोख बजावतात. इतका अचूकपणा येण्यासाठी किती तालमी आणि केवढे परिश्रम घेतले असतील याची कल्पना करणे कठीण. गायकांनी काही गाण्यांचा सराव अजून कसून करायला हवा असे वाटते. अर्थात प्रयोगानुरूप त्यात अधिक सुधारणा होतीलच. अनेक मान्यवर आणि ताकदीचे कलाकार या कार्यक्रमात गायक, वादक आणि नर्तक म्हणून सहभागी झाले आहेत. त्यातल्या काहीच जणांची नावे घेणे इतरांवर अन्यायकारक ठरेल म्हणून नामनिर्देश टाळतो. मात्र अशोक हांडे यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. हा एकटा माणूस इतक्या जबाबदाऱया पार पाडूनही शेवटी निर्मात्याच्या भूमिकेत दशांगुळे वर उरतोच. त्यांच्या इतर अनेक कार्यक्रमांप्रमाणेच हा कार्यक्रम प्रचंड खर्चिक आहे आणि हे बघतानाच जाणवते. इतक्या मोठय़ा ताफ्याची अचूक मोट बांधणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी नीटनेटके प्रयोग करणे हे अशोक हांडेच करू जाणोत.

एकंदरीत ‘लार्जर दॅन लाइफ’ सिनेमाप्रमाणेच असलेला, हिंदी चित्रपटाचे शोमन असलेल्या राज कपूर यांचा हा जीवन प्रवास एका भव्यदिव्य सांगीतिक कार्यक्रमाद्वारे रंगमंचावर आणणाऱया चौरंग या संस्थेचे आणि त्याचे सर्वेसर्वा असलेल्या अशोक हांडे यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन. या कार्यक्रमाचेसुद्धा हजारो प्रयोग होवोत या शुभेच्छा. हिंदी सिनेमाचे आणि राज कपूर यांचे चाहते असणाऱया प्रत्येकाने हा कार्यक्रम आवर्जून पाहायलाच हवा आणि इतरांनाही रंगमंचावरील हे अद्भुत सादरीकरण दाखवायला हवे. कार्यक्रम हिंदीत असल्याने त्याला एक मोठा प्रेक्षक वर्ग लाभेल ही खात्री आहेच. ‘आवारा हूं’ हे चौरंगच्या शिरपेचात खोवलेले हे अजून एक मानाचे ‘राज’वर्खी पान आहे हे नक्की.

[email protected]

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.