गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
एक होता मॉन्टू. पिटुकल्या मॉन्टूला खेळणी खेळायला खूप आवडायचं. त्याला पुस्तकं वाचायला आवडायचं आणि चित्र काढायला तर खूपच आवडायचं. मॉन्टू एक गुणी मुलगा होता, पण त्याचं एक मोठ्ठं गुपित होतं. ते म्हणजे एक बागुलबुवा! मोठा गुलाबी रंगाचा, भयंकर चेहऱ्याचा! एक असा बागुलबुवा जो कोणालाच दिसायचा नाही, जो कोणालाही कधीच ऐकू यायचा नाही, तो फक्त मॉन्टूलाच दिसायचा! अर्थात, नेहमीच तो दिसायचा असं नाही. जेव्हा जेव्हा मॉन्टू दुःखी असतो, उदास असतो, चिड चिड करतो किंवा घाबरलेला असतो ना, तेव्हा तेव्हा हा बागुलबुवा त्याच्या समोर प्रकट होतो. बाकीच्या वेळी तो नसायचा आसपास!
या बागुलबुवामुळे व्हायचं असं की, मॉन्टू आणखी उदास व्हायचा, आणखी चिडचिडा व्हायचा आणि आणखी अस्वस्थ व्हायचा. कधी झाली होती या बागुलबुवाशी त्याची पहिली गाठ भेट?
जेव्हा त्याचं पहिलं खेळणं हरवलं, तेव्हा?
जेव्हा त्याचा बेस्ट फ्रेंड त्याला सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेला, तेव्हा?
जेव्हा मैदानावर खेळायला गेला असताना तिथल्या मुलांनी त्याला चिडवलं, तेव्हा?
जेव्हा एकदा त्याचा होमवर्क करायचा राहून गेल्यामुळे त्याच्या बाई त्याला रागावल्या होत्या, तेव्हा?
जेव्हा त्याची आज्जी देवाघरी गेली, तेव्हा?कोणास ठाऊक? अशा अजूनही काही गोष्टी असू शकतील, पण त्या बागुलबुवाचा मॉन्टूला फार त्रास व्हायचा, हे मात्र खरं! एके दिवशी काय झालं, मॉन्टू कुठेतरी धडपडला आणि त्याच्या पायाला लागलं. एवढं की, त्याला खेळायला कुठे बाहेर जाता येईना. घरात बसून त्याची लाडकी खेळणी खेळायचीसुद्धा त्याला इच्छा होईना. एवढंच काय, त्याची आवडती पुस्तकं, पण त्याला वाचवीशी वाटत नव्हती. तो अगदी कंटाळून गेला होता. वैतागून गेला होता, हिरमुसून गेला होता!
तेवढ्यात त्याची आई त्याच्या खोलीत आली. मॉन्टूचा पडलेला चेहरा बघून तिला कसंसंच झालं. ती त्याला म्हणाली, ‘‘तू चित्र का नाही काढून बघत?’’ आईला वाटलं चित्र काढण्याचं आवडीचं काम केल्यावर मोंटूला थोडं बरं वाटेल. त्याचा मूड कदाचित चांगला होईल. खरं तर, मॉन्टूला अजिबात चित्र काढावंसं वाटत नव्हतं, पण आईने सुचवलंय म्हणून त्यानं जरा अनिच्छेनेच पेन्सिल आणि चित्रकलेची वही हातात घेतली. त्याने कोणाचं चित्र काढलं माहीतय का? तर, त्या बागुलबुवाचं जो खिडकीतून आत डोकावत होता!
मॉन्टूच्या पानावर आता होता एक मोठा बागुलबुवा आणि त्याच खिडकीतून दिसणारं एक झाड आणि गवत. मोंटूनं खिडकीकडे पाठ फिरवली मात्र - तितक्यात त्याला बाहेरून एक आवाज आला.
काव! काव! काऽऽऽव!बापरे! हा तोच बागुलबुवा असला तर??
मोंटूनं जरा भीत भीतच खिडकीबाहेर पाहिलं. अरेच्चा! तो तर होता एक कावळा! हुश्श! मॉन्टूच्या चित्रातला बागुलबुवा तिथेच होता, पण आता त्याच्या जोडीला होता एक कावळा. पुन्हा आवाज आला.
गुटर्र गुटर्र...आई गं! हा तोच बागुलबुवा असेल का? ओह! कबूतर आहे काय! मोंटूच्या चित्रातला बागुलबुवा तिथेच होता फक्त आता त्याच्या जवळ होता एक कावळा आणि एक कबूतरसुद्धा!
कुई- कुई, कुई- कुई! नाही नाही- हा तोच बागुलबुवा तर नसेल ना? ही तर खारू ताई! मोंटूच्या चित्रातला बागुलबुवा तिथेच होता पण आता शेजारी एक कावळा, एक कबूतर आणि एक खारुताईही होती.
भोऽ- भोऽऽ! भोऽ- भोऽऽ!या वेळी मात्र मोंटूला अजिबात शंका आली नाही हं! कारण, हा आवाज त्याच्यासाठी रोजचा, अगदी ओळखीचा होता. शेरूचा - गल्लीतल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज होता तो!
मॉन्टूच्या चित्रात आता एक कावळा होता, एक कबूतर होतं, एक खारूताई, एक कुत्रा आणि एक छोटुसा इटुकला पिटुकला बागुलबुवा सुद्धा होता!
अरे हे काय? मॉन्टूच्या चेहऱ्यावर आता चक्क हसू फुटलं होतं!छोटुकल्या मॉन्टूची ही छोटीशीच गोष्ट. ही मूळ इंग्रजी गोष्ट लिहिलीय मेघा गुप्ता यांनी. यातला गुलाबी रंगाचा बागुलबुवा जो हळूहळू प्रत्येक चित्रागणिक आकाराने लहान होत जातो, मॉन्टूने काढलेली गोंडस रेखाटानं यांची चित्र सौम्य मेनन यांनी काढलीहेत. याचा मराठी अनुवाद वैभवी देशपांडे यांनी केला असून, हे पुस्तक तुलिका प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे.
तशी छोटीशी ही गोष्ट, पण केवढा मोठा अर्थ सामावलाय हिच्यात. न दिसणाऱ्या या शत्रूशी भांडायचं तरी कसं? मुळात बागुलबुवाला कायमस्वरूपी घालवता येऊ शकतं का? काय माहीत. पण हो, आपल्याला दडपून टाकणारा मनातला मोठा बागुलबुवासुद्धा हळू हळू असा लहान नक्की होऊ शकतो. फक्त त्यासाठी खिडकीतून दिसणाऱ्या इतर सुंदर गोष्टींवर जास्त लक्ष द्यायचं आणि मॉन्टूने घेतली तशी एखादी पेन्सिल घ्यायची मदतीला. काहींनी सूर घ्यावेत, काहींनी नाच घ्यावा, काहींनी शब्द घ्यावेत सोबतीला. म्हणजे मग आपल्या आयुष्याचं चित्र रेखाटताना हा बागुलबुवा असा पानभर व्यापून राहणार नाही, तर एक छोट्याशा कोपऱ्यात बसलेला असेल आणि आपल्या चेहऱ्यावर असेल हसू, अगदी मॉन्टूसारखं!