अमेरिकेची २१ वर्षीय युवा खेळाडू कोको गॉफ हिने अव्वल मानांकित अरीना सबलेंका हिचा संघर्ष तीन सेटमध्ये परतवून लावला आणि पहिल्यांदाच फ्रेंच ओपन या लाल मातीवरील ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. गॉफच्या या देदीप्यमान कामगिरीनंतर सेरेना विल्यम्स हिचे माजी प्रशिक्षक पॅट्रिक माऊराटोग्लोयू यांंनी कौतुक केले. महिला टेनिसमधील एकमेव सुपरस्टार खेळाडू म्हणून तिचा उल्लेख केला. पॅट्रिक यांच्या ‘बोल्ड’ वक्तव्यानंतर स्तुती व टीका अशा दोन्ही प्रकारे प्रतिक्रिया उमटू लागल्या. सध्याच्या घडीला गॉफ हिच्याकडून सुवर्ण भविष्याची अपेक्षा केली जात आहे.
कॉरी डियॉनी हिला कोको गॉफ या नावाने ओळखले जाते. कोको हिचा जन्म १३ मार्च २००४मध्ये अटलांटा, जॉर्जिया येथे झाला. कोको हिचे आईवडील क्रीडापटू असल्यामुळे तिच्या रक्तातच खेळ भिनला आहे. आई कँडी हिला सुरुवातीला जिम्नॅस्टिक्समध्ये आवड होती; पण कुटुंबाच्या विरोधामुळे कँडी हिने जिम्नॅस्टिक्समधून माघार घेतली. त्यानंतर अॅथलेटिक्सकडे तिने धाव घेतली. हेप्टॅथलॉन या क्रीडा प्रकारात हात आजमावले. कँडी हिने फ्लोरिडा राज्य विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. वडील कोरे हे जॉर्जिया राज्य विद्यापीठाकडून बास्केटबॉल खेळत असत. त्यानंतर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोको ही टेनिस या खेळातील बारकावे आत्मसात करू लागली. कोको हिला लहानपणी विविध खेळांबाबत गोडी लागली. जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स असे विविध खेळ ती खेळू लागली, पण टेनिस या खेळावर ती जीवापाड प्रेम करू लागली. त्यानंतर याच खेळामध्ये पुढे जायचे तिने ठरवले. यानंतर मागे वळून बघितले नाही.
कोको वयाच्या सहाव्या वर्षापासून टेनिस खेळू लागली. अगदी लहान वयामध्ये तिच्यामधील क्षमता पाहून आई-वडिलांनी फ्लोरिडा येथे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. फ्लोरिडा येथील डेलरे बीच येथे टेनिस या खेळासाठीच्या उत्तम सोयीसुविधा उपलब्ध आहेत. व्हीनस व सेरेना या अमेरिकेतील महान टेनिसपटूंनीही येथेच सराव करून आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये वर्चस्व गाजवले. कोको हिच्या कुटुंबीयांनी विल्यम्स भगिनींची यशाची गाथा वाचली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. कोको हिची टेनिस या खेळातील कारकीर्द उजळण्यासाठी आई-वडिलांनी प्रयत्नांची शिकस्त केली. कोको हिचे पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून वडिलांनी पुढाकार घेतला. आईने घर व शाळा याकडे विशेष लक्ष दिले.
अमेरिकेतील बहुतांशी युवा टेनिसपटू आयएमजी अकादमीत टेनिस या खेळाचे प्रशिक्षण घेत असतात. या अकादमीत सराव करण्यासाठी एक वर्षाला ८० हजार डॉलर्सपर्यंत खर्च करावा लागत असे. कोको हिच्या कुटुंबीयांना हा खर्च परवडणारा नव्हता. आयएमजी अकादमीत स्लोअन स्टीफन्स, मेडिसन कीज यांसारखे स्टार खेळाडू घडले. याप्रसंगी कोकोच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. फ्रान्समधील माऊराटोग्लोयू या प्रतिष्ठित अकादमीत तिला प्रवेश मिळाला. स्कॉलरशिपद्वारे तिला या अकादमीत प्रवेश देण्यात आला.
वयाच्या दहाव्या वर्षी तिने १२ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी ती इतिहासातील सर्वात लहान खेळाडू ठरली. कोको हिला लहान वयामध्ये भव्यदिव्य यशाला गवसणी घालता आली. वयाच्या दहाव्या वर्षी ‘नाईकी’सारख्या मोठ्या क्रीडासंबंधित कंपनीकडून प्रायोजकत्व देण्यात आले. वयाच्या १४व्या वर्षी तिने फ्रेंच ओपन ज्युनियर ग्रँडस्लॅम जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. ज्युनियर स्तरावरील क्रमवारीत तिने पहिल्या स्थानावर झेप घेतली. ही वाखाणण्याजोगी बाब.
वयाच्या १५व्या वर्षी कोको पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये सहभागी झाली. विम्बल्डन या ग्रँडस्लॅमध्ये सहभागी होणारी ती सर्वात लहान वयाची टेनिसपटू ठरली. या स्पर्धेमध्ये तिने आपली आदर्श खेळाडू व्हीनस विल्यम्स हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. मात्र या सनसनाटी विजयानंतरही कोको हिचे पाय जमिनीवर होते. या लढतीनंतर कोको हिने व्हीनसचे आभार मानले. तुझा खेळ बघूनच माझी पावले या खेळाकडे वळलीत, असे ती या वेळी म्हणाली. व्हीनस व सेरेना या बहिणींना कोको आपला आदर्श मानते. विम्बल्डनमध्ये कोको हिला चौथ्या फेरीत सिमोना हालेप हिच्याकडून हार पत्करावी लागली. सिमोना हिने पुढे जाऊन या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कोको २०२०मध्ये क्रमवारीत ६७व्या स्थानावर होती. त्यानंतर पुढील वर्षी (२०२१) तिने डब्ल्यूटीए क्रमवारीत अव्वल २५ टेनिसपटूंच्या यादीत झेप घेतली. टोकियो ऑलिंपिकसाठीही तिची अमेरिकन संघामध्ये निवड करण्यात आली. ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारी ती दुसरी सर्वात लहान टेनिसपटू ठरली असती. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तिला ऑलिंपिकमधून माघार घ्यावी लागली. २०२२मध्ये कोको हिने यशाची पावले सर केली. वरिष्ठ स्तरावरील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत तिला पोहोचता आले. इगा स्विअतेक हिच्याकडून तिचा पराभव झाला. यामुळे फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅममध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. क्रमवारीतही तिला अव्वल १० खेळाडूंच्या यादीत झेप घेता आली.
कोको हिच्या खेळाचा आलेख उंचावत राहिला. २०२३मध्ये तिने अमेरिकन ओपन या हार्डकोर्टवरील ग्रँडस्लॅममध्ये संस्मरणीय विजेतेपद पटकावले. अरीना सबलेंकाचे आव्हान तिने तीन सेटमध्ये परतवून लावले आणि घरच्या मैदानावर ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा श्रीगणेशा केला. कोको हिला दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली. २०२३नंतर तिने यंदा (२०२५) फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जेतेपदावर हक्क सांगितला. याआधी २०१५मध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जिंकले होते. तब्बल १० वर्षांनंतर अमेरिकन खेळाडूला या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरता आले आहे.
कोको ही मूळची अमेरिकन टेनिसपटू. अमेरिकेत हार्डकोर्टवर अधिक प्रमाणात टेनिसचा खेळ रंगतो. त्यामुळे तिला हार्डकोर्टवर खेळायला अधिक आवडते. ती आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखली जाते. तिची सर्व्हिसही भेदक आहे. ब्रॅड गिलबर्ट यांच्या मार्गदर्शनात कोको हिने आपल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला. पण २०२४पासून कोको ही मॅट डॅली यांच्या मार्गदर्शनात टेनिसमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॅली यांनी तिची सर्व्हिस, फोरहँडचा फटका, रॅकेट पकडण्याची पद्धत यावर अधिक मेहनत घेतली. याचे चांगले परिणाम फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅममध्ये दिसून आले आहेत. कोको हिच्या कारकीर्दीची सुरुवात छान झाली आहे. ती सेरेना हिला आपला आदर्श मानते. सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदांना गवसणी घालत महान टेनिसपटूंच्या यादीत स्थान मिळवले. सेरेनाला मार्गरेट कोर्टच्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी करता आली नाही. कोको हिला मोठा टप्पा गाठायचा आहे. दुखापत, फॉर्म याकडे तिने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. यानंतर तिला प्रदीर्घ वर्षांची यशस्वी कारकीर्द घडवता येईल.