तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमधील पहिली ते आठवीचे वर्ग सोमवारपासून (ता. १६) सुरू होत असून, शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत. याबाबतची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाने केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या नवी मुंबई महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित अशा एकूण १५२ शाळांमध्ये शिकत असलेल्या ६१ हजार ८७९ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येणार आहेत.
इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये तसेच शाळेत दाखल झालेल्या सर्व मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, त्याचप्रमाणे गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सर्व पाठ्यपुस्तके महापालिकेकडून ४ ते १० जून या कालावधीत शाळेच्या मुख्याध्यापकांना वितरित करण्यात आलेली आहेत. ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे विभागातील पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी वितरित करतील, अशी माहिती शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी दिली.