Solapur Crime : देवदर्शनाला गेल्यावर व्यापाऱ्याचे घर फोडले; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
esakal June 16, 2025 04:45 AM

सोलापूर : शिर्डीला देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शुक्रवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास शेळगीतील महेश थोबडे नगरात ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादी शिवानंद लिंगण्णा कडबगावकर (वय ६२, रा. महेश थोबडे, नगर शेळगी) हे कुटुंबीयासह गुरुवारी (ता. १२) सकाळी १० वाजता देवदर्शनासाठी शिर्डीला गेले होते. शुक्रवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना फोनवरून कळवले. तसेच जोडभावी पेठ पोलिसांना सांगितले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर बंद घराचा कडी-कोयंडा तुटल्याचे आढळले. तसेच घरातील दोन्ही कपाटही फोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक तपास करीत आहेत.

कपाटाचे लॅक तोडले

चोरट्याने कडी-कोयंडा तोडून आता लोखंडी व लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यात दोन लाखांच्या ४० ग्रॅमच्या पाटल्या, साडेसात हजारांचे १५ ग्रॅमचे मिनी गंठण, २५ हजारांची पाच ग्रॅमची गुलाबी खडा असलेली अंगठी, ५० हजारांच्या १० ग्रॅमच्या कानातील रिंग, ५० हजारांच्या १० ग्रॅमच्या लहान मुलीच्या एकजोड बांगड्या, एक लाख ५० हजारांचे ३० ग्रॅमचे चपलाहार असा एकूण पाच लाख ५० हजारांचे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.