₹7 Lakh RTO Challan Scam in Pune: 'आरटीओ चलन'च्या नावाने महिलेची सात लाखांची फसवणूक
esakal June 17, 2025 03:45 AM

पुणे : सायबर चोरट्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नावाने ‘एपीके फाइल’द्वारे बनावट ट्रॅफिक चलन पाठवून एका महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जांभूळवाडी रस्ता परिसरातील एका ३३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी २१ मे रोजी त्यांच्या मोबाइलवर ‘आरटीओ ट्रॅफिक चलन- ५००’ नावाची एपीके फाइल पाठवली. यामध्ये वाहतूक नियमभंगाचे चलन असल्याचे भासविण्यात आले. चलन असल्याचे समजून महिलेने फाइल उघडताच तिचा मोबाइल हॅक झाला.

मोबाइल हॅक होताच चोरट्यांनी महिलेचे सोशल मीडिया अकाउंट निष्क्रिय करून तिच्या बँक खात्याशी संबंधित सर्व गोपनीय माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून त्यांनी सात लाख रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करून घेतले. या घटनेनंतर महिलेने १५ जून रोजी आंबेगाव तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले करीत आहेत.

अनोळखी एपीके फाइलपासून सावध रहा

सायबर गुन्हेगारांकडून बनावट एपीके फाइल्स पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद फाइल्स उघडू नयेत. नागरिकांनी कुठल्याही अनोळखी लिंक किंवा फाइल उघडण्याआधी खातरजमा करावी. अशा घटनांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.