पुणे : तरुणीची छेड काढल्याच्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आंबेगाव परिसरातील जांभूळवाडी तलावाजवळ घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.
रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा. योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय २१, रा. नऱ्हे) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित, सूरज आणि दीपक हे तिघेजण मित्र होते. सूरजने एका तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरून रोहितचा सूरजशी वाद झाला होता. शनिवारी (ता. १४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे तिघे जांभूळवाडी तलावाजवळ गेले होते. त्यावेळी जुन्या वादावरून सूरज आणि रोहितमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात सूरजने तेथेच पडलेला दगड उचलून रोहितच्या डोक्यात घातला. त्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे करीत आहेत.