पुणे : शहरात मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्रीपर्यंत १३ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. काही भागांमध्ये फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, सुदैवाने या घटनांमध्ये कुणालाही इजा झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यांवर अडथळा झालेल्या झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.
पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये झाडे कोसळली. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. सोमवारी रात्रीपर्यंत शहरात १३ ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
झाडपडीची ठिकाणे :प्रभात रोड गल्ली क्रमांक १४, पाषाणमधील अभिमानश्री सोसायटी आणि सोमेश्वरवाडी, बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, कोथरूडमधील महात्मा सोसायटी आणि रामबाग कॉलनी, सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक, महापालिका भवन, घोरपडीतील सोपानबाग, बिबवेवाडीतील हॉटेल रुपाली, सिंहगड रस्त्यावरील नित्यानंद हॉल आणि खराडीतील ठुबेनगर परिसर.
जुन्या वाड्याची भिंत कोसळली :फडके हौद चौक परिसरातील एका जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. तर सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एक जाहिरात फलकही पडला. या दोन्ही ठिकाणी कोणी जखमी झाले नाही.