Satara Monsoon Update : पावसाचा हाहाकार! कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद; वाजेगावमध्ये पर्यायी रस्ता वाहून गेला
esakal June 17, 2025 03:45 PM

पाटण : वाजेगाव येथील पर्यायी वळण रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेल्याने आज दुपारी दोन वाजल्यापासून कऱ्हाड - चिपळूण राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे लहान वाहनांची वाहतूक नेरळे मेंढेघरमार्गे सुरू असून, अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ‘सकाळ’ने १५ जूनच्या अंकात पाऊस थांबला नाही, तर कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद होईल, अशी व्यक्त केलेली भीती आज जनतेला अनुभवायला मिळाली.

रविवारी रात्रीपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासून ओढे- नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम कऱ्हाड- चिपळूण महामार्गावरून होणारी वाहतूक बंद पडली आहे. ‘सकाळ’ने १५ जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये प्रामुख्याने पर्यायी वळण रस्ता तयार करताना टाकलेल्या पाइप लहान आकाराच्या असून, मुसळधार पाऊस कोसळल्यास ओढ्याला येणारे पाणी बसणार नाही आणि पाणी तुंबून राहिले तर पर्यायी मार्गाचा भराव वाहून जाईल, अशी शक्यता व्यक्त केली होती.

तसाच प्रकार रात्री पडलेल्या व दिवसभर कोसळलेल्या पावसाने झाला असून, वाजेगाव येथील पुलाची उभारणी करण्यात आली आहे.भराव केलेला होता. मात्र, पर्यायी वळण रस्त्यावरील लहान आकाराच्या पाइपमध्ये पाणी न बसल्याने ते साठत गेले व पर्यायी वळण रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे पर्यायी वळण रस्ता खचला आणि नवीन उभारणी केलेल्या पुलाचा भरावही वाहून गेला आहे.

प्रशासनाने याबाबत दखल घेत नेरळे गौंड येथे कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद केला असून, नेरळे मेंढेघरमार्गे लहान वाहनांची वाहतूक वळविली आहे. अवजड वाहने त्या मार्गावरून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा कोयना विभागातील हेळवाक व पाटण बाजूला लागल्या आहेत. पोलिस उपअधीक्षक विजय पाटील यांनी दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवला आहे..

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठले असून, रासाठी येथे पाण्याचा अंदाज न आल्याने चिपळूण आगाराची बस नाल्यात जाऊन झालेल्या अपघातात आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, तारळे विभागातील मुरूड तोंडोशी या दोन गावांना जोडणारा लोखंडी साकव सुरक्षिततेसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.