Solapur Crime: न्यायालयाचा निकाल!'अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास जन्मठेप'; मदतगारास कारावास, फोटो व्हायरलची धमकी अन्
esakal June 18, 2025 05:45 PM

सोलापूर : सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पीडितेला पळवून नेण्यास मदत करणाऱ्यालाही तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहित ऊर्फ रोहन मारुती बनसोडे (वय २४, रा. बापूजीनगर, सोलापूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्याचे नाव असून सुमीत शशिकांत काटकर (वय १९, रा. राजस्वनगर, विजयपूर रोड, सोलापूर) असे मदत करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी २०२० मध्ये सोलापुरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. ती शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीने मोबाईलवरील इन्स्टाग्रामवर अकाउंट काढून दिले. पीडिता इन्स्टाग्राम वापरत असताना रोहित बनसोडे याच्याशी तिची ओळख झाली. ओळख वाढवून रोहितने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पीडिता व रोहित भेटू लागले. रोहितने पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ म्हणून दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले.

त्या ठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केले. रोहितने पीडितेला व्हिडिओ शूटिंग व फोटो काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. रोहित वारंवार त्रास देऊन छळ करून तिच्याकडील पैसे, सोन्याचे दागिने घेऊन गेला होता. त्यानंतर १६ मे २०२१ रोजी रोहितने आपला मित्र सुमीत काटकर याच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळवून नेले होते. तसेच पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाणही केली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांत पीडितेच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली होती.

तत्कालीन पोलिस निरीक्षक वाय. एस. गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधले व रोहित बनसोडे, सुमीत काटकर यांना अटक केली होती. तपासात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यांमध्ये पोक्सो, बलात्काराचे कलम वाढविण्यात आले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली.

१५ साक्षीदारांची साक्ष अन् अचूक युक्तिवाद

या खटल्यात सरकारतर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीने पीडितेवर फक्त शारीरीक अत्याचार केला नाही तर अनेकवेळा मारहाण करून ब्लॅकमेल केल्याचेही सरकारी पक्षाने सिद्ध केले. साक्षीदारांची साक्ष, पीडितेची साक्ष, पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपींतर्फे ॲड. इस्माईल शेख, ॲड. पी. जी. देशमुख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी घाडगे, आणि ए. एम. काळे यांनी मदत केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.