Kolhapur : मालकाच्या मित्राचे पैसे पाहून कामगाराच्या मनात १ कोटी ९० लाख रूपये चोरण्याचा विचार, सख्ख्या भावासह मित्रांचा प्लॅन; पण...
esakal June 18, 2025 05:45 PM

Kolhapur Crime : मालकाच्या मित्रांची रक्कम वेगवेगळ्या वाहनांतून दररोज येताना पाहून कामगाराच्या मनात चोरीचा विचार आला. सख्ख्या भावासह चार मित्रांना घेऊन महिन्यांपासून पाळत ठेवून गुडलक स्टेशनरीतील कामगार स्वरूप संजय शेळके (वय २५, रा. लक्षतीर्थ वसाहत) याने तब्बल एक कोटी ९० लाखांच्या रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.

गांधीनगर येथे १३ जूनच्या मध्यरात्री टेम्पोची काच फोडून झालेल्या लुटीचा उलगडा करत पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले. चोरीतील एक कोटी ७८ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी स्वरूप संजय शेळके (वय २५), त्याचा सख्खा भाऊ सम्राट (२४), योगेश किरण पडळकर (३०, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत), गोट्या ऊर्फ स्वयम सचिन सावंत (१९, रा. जुना बुधवार पेठ) याला अटक केली. या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गांधीनगरातील गणेश टॉकीजच्या पिछाडीस असलेल्या गुडलक स्टेशनरीच्या पार्किंगमधील टेम्पोतून ५० लाखांची रक्कम चोरून नेल्याची फिर्याद कैलास वसंत गोरड (रा. बेळगाव) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली होती.

टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेली रक्कम अत्यंत चिंचोळ्या बोळातून नेण्यात आल्याने चोरटे माहितगार असावेत, असा पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता. स्थानिक गुन्हे शाखा व गांधीनगर पोलिसांची चार पथके चोरट्यांच्या मागावर होती.

गांधीनगर येथे पैसे चोरणाऱ्या टोळीत योगेश पडळकरचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती उपनिरीक्षक संतोष गळवे व अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली. तो साथीदारांसह सोमवारी हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याचे समजताच सापळा रचून चौघांना पकडण्यात आले. योगेशसह स्वयंम सावंत, सम्राट शेळके व अल्पवयीन संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुडलक स्टेशनरीत काम करणाऱ्या स्वरूप शेळकेचे नाव समोर आले.

गांधीनगरातील प्रकाश वाधवानी यांच्या गुडलक स्टेशनरीमध्ये मागील दीड वर्षांपासून स्वरून शेळके काम करत होता. मालकांकडे वेगवेगळ्या मित्रांची रक्कम मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती त्याला होती. त्यामुळे या रकमेवर डल्ला मारण्याचे ठरवले. भाऊ सम्राटसह योगेश पडळकर, स्वयंम सावंत व अल्पवयीन संशयिताला घेऊन त्यांनी राजेंद्रनगरात महिन्याभरापासून तयारी केली होती.

मध्यरात्री पोत्यातून नेली रोकड

शुक्रवारी मध्यरात्रीची वेळ निवडून दोन दुचाकींवरून गांधीनगर गाठले. यावेळी स्वरूप शेळके त्यांच्यासोबत नव्हता. टेम्पोची काच फोडून रक्कम भरलेले पोते घेऊन सर्वजण मंगळवार पेठेत पोहोचले. स्वरूप सावंत याच्या जुन्या घरी कोणी राहत नसल्याने तिथे रक्कम ठेवली. काही पैसे सोबत घेऊन चौघांनी गोवा गाठला. पडळकर याच्याकडे अचानक पैसे आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत चोरीचा उलगडा झाला.

फिर्यादी कैलास वसंत गोरड (रा. शहापूर, बेळगाव) यांनी दुसऱ्या दिवशी गांधीनगर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. यामध्ये त्यांनी ५० लाख रुपये गेल्याचे म्हटले होते. ही रक्कम एक कोटींहून अधिक असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. गोरड यांनी पुन्हा नव्याने दिलेल्या माहितीनुसार आणखीन काही व्यापाऱ्यांचीही रक्कम त्यामध्ये असल्याचे सांगत एक कोटी ९० लाख रुपये चोरीस गेल्याचा पुरवणी जबाब दिला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.