मेढा : वाटांबे (ता. जावळी) गावच्या हद्दीत मागील आठवड्यात रात्री सिकंदर इस्माईल मोमीन, मुसा इस्माईल मोमीन (दोघे रा. चाफळ, ता. पाटण) यांना मारहाण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी मेढा पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या विनोद रामचंद्र तुपे (रा. वडोली भिकेश्वर, ता. कऱ्हाड) व त्याचा साथीदार प्रफुल्ल मोहन पटेल (रा. वाघेरी, ता. कऱ्हाड) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बुधवारी (ता. ११) सातारा- महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटातील वाटांबे गावच्या हद्दीत कोंबड्यांच्या व्यवसायाच्या कारणावरून सिकंदर मोमीन व मुसा मोमीन यांना विनोद तुपे व त्याच्या साथीदारांनी मोटारीतून येऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले, तसेच लाकडी दांडके, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याबाबत सिकंदर मोमीन यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत वाघेरी (ता. कऱ्हाड) येथे प्रफुल्ल पटेल यास त्याच्या डोंगराच्या कडेला असलेल्या शेतातील शेडमधून ताब्यात घेतले, तसेच त्याचा गुन्ह्यातील साथीदार असलेल्या विधिसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले.
मुख्य संशयित आरोपी विनोद तुपे यास अटक केली असून, त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील करत आहेत.