पद्मश्री मारूती चितमपल्ली यांचे 'हे' स्वप्न राहिले अधुरे! प्राणीकोशाची छपाई सुरू, मत्स्यकोश छपाईस द्यायचे होते, वृक्षकोशावर सुरू होते काम; मृत्यूच्या १५ दिवसांपूर्वीही सुरू होते लिखाण
esakal June 19, 2025 10:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी २६ पुस्तके लिहिली. काही वर्षांपासून रात्रंदिवस जागून त्यांनी प्राणीकोशाचे काम पूर्ण केले होते. त्यासाठी लागणारी छायाचित्रे देखील त्यांनी प्रकाशकाकडे दिली होती. सध्या त्या कोशाची छपाई सुरू होती. तसेच त्यांच्या मत्स्यकोशाचेही काम पूर्ण झाले होते. काही दिवसांनी तो कोश छपाईला देण्याचेही त्यांचे नियोजन होते. याशिवाय सध्या ते वृक्षकोशावर काम करीत होते.

अखंड भारतात नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान येथील भूमीचा समावेश होता. त्या अखंड भारतातील वृक्षांची माहिती त्यात समाविष्ट करण्याचे त्यांचे नियोजन होते. महाराष्ट्रासह भारतातील वृक्षांची माहिती त्यांनी मिळविली होती. आता नेपाळ, अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील वृक्षांची माहिती घेऊन तो कोश पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, त्यांच्या जाण्यामुळे ही सर्व कामे तथा त्यांचे स्वप्न अर्ध्यावरच राहिले.

मृत्यूच्या १५ दिवसांपूर्वीदेखील सुरू होते लिखाण

अरण्यऋषी अजूनही पहाटे चार वाजता उठत होते. उठल्यानंतर सकाळी, दुपारी, रात्री ११ वाजेपर्यंत त्यांच्या दिनक्रमात वाचन व लिखाण सुरूच होते. त्यांचा पुतण्या श्रीनिवास म्हणाले, ‘ज्यावेळी त्यांच्या खोलीत पाहायचो त्यावेळी ते वाचन किंवा काहीतरी लिखाण करत बसलेले दिसायचे’.

‘हे’ स्वप्न राहिले अधुरेच

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी तब्बल दहा हजार मौल्यवान पुस्तकांचा संग्रह करून ठेवला होता. आणखी २० हजार पुस्तके ते घेणार होते. ती पुस्तके अभ्यासक, विद्यार्थ्यांसह सर्वांसाठीच उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनाकडून एक रूपयाची मदत न घेता स्वत: जागा घेऊन त्याठिकाणी संग्रहालय उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. संग्रहालयाचे बांधकामही अंतिम टप्प्यात आले असून श्रावण महिन्यात संग्रहालय सुरू करण्याचे त्यांचे नियोजन होते. तोपर्यंत त्यांच्या वृक्षकोश व प्राणीकोशाचे प्रकाशन देखील होणार होते. पण, त्यांच्या निधनाने पद्मश्रींचे ते स्वप्न अधुरेच राहिले. त्यांच्या मत्स्य व वृक्ष कोशाची छपाई पूर्ण करून त्यांचे संग्रहालय सुरू करण्याचे स्वप्न आम्ही लवकरच पूर्ण करू, असे श्रीनिवास यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.