संभल हिंसाचार प्रकरणात 1,200 पृष्ठ चार्जशीट
Marathi June 19, 2025 03:25 PM

वृत्तसंस्था/ लखनौ

संभल हिंसाचार प्रकरणात एसआयटीने 1,200 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सपा खासदार झिया-उर-रहमान बर्क यांच्यासह 23 जणांची नावे आहेत. गेल्यावर्षी 24 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये हिंसाचार झाला होता. हिंसाचारापूर्वी सपा खासदार बर्क यांच्यावर लोकांना भडकावण्याचा आरोप आहे. जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू झाला होता. तसेच 29 पोलीस जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 10 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.  खासदार झिया-उर-रहमान बर्क आणि आमदार इक्बाल महमूद यांचा मुलगा सुहेल इक्बाल याच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात 90 आरोपी असून सर्वजण तुरुंगात आहेत.

गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारानंतर अनेक दिवस इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. तसेच परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. हिंसाचाराचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. अलीकडेच एसआयटी टीम दिल्लीतील झिया-उर-रहमान बर्कच्या निवासस्थानीही तपासासाठी पोहोचली होती.

 

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.