प्रशासकीय सेवांमध्ये (IAS, IPS, IFS) जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) ने नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 (UPSC CSE Mains Exam 2025) साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार पूर्वपरीक्षा (Prelims) पास झाले आहेत, त्यांनी आता मुख्य परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर २५ जून २०२५ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
२५ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या UPSC च्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून एकूण १४,१६१ उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत. आता या सर्व पात्र उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
UPSC च्या अधिकृत परीक्षापत्रकानुसार, सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून ती २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालेल. ही परीक्षा विविध केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेच्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.
सामान्य प्रवर्ग आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹200 निश्चित करण्यात आलं आहे. मात्र महिलांसाठी, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी (PwBD) अर्ज पूर्णपणे मोफत आहे. शुल्काचे पेमेंट ऑनलाइन मोडद्वारे करता येईल.
ज्या उमेदवारांना परीक्षेदरम्यान लेखक (scribe), मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका किंवा अन्य कोणतीही सहाय्यक सुविधा आवश्यक आहे, त्यांनी ती माहिती अर्जात स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. यामुळे आयोग त्या उमेदवारांसाठी योग्य व्यवस्था करू शकतो.
नावातील बदलासंदर्भातील सूचना:
ज्या उमेदवारांचे नाव मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रापेक्षा वेगळे आहे किंवा ज्यांनी अलीकडे नाव बदलले आहे, त्यांनी अर्ज करताना गॅझेट नोटिफिकेशन किंवा इतर अधिकृत कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज अमान्य होऊ शकतो.
अर्ज प्रक्रियेबाबत कुठलीही शंका असल्यास, उमेदवार UPSC च्या नवी दिल्ली येथील शाहजहाँ रोडवरील ‘सुविधा काउंटर’ला सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देऊ शकतात. त्याशिवाय, आयोगाच्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावरूनही मदत घेता येते.