उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा दिली होती. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. खासकरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता. मात्र आता एका मनसे कार्यकर्त्याला एकनाथ शिंदेंना जय गुजरातवरुन डिवचणं महागात पडलं आहे. त्याच्याविरोधात कल्याणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मनसे कार्यकर्त्यावर गु्न्हा दाखल
समोर आलेल्या माहितीनुसार, मनसेचा कार्यकर्ता रोहन पवार याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. रोहनने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा फोटो टाकत त्याला जय गुजरात असं कॅप्शन दिले होते. याबाबत स्वप्निल एरंडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता रोहनविरोधात कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कल्याणमधील राजकीय वातावरण तापले आहे.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदेंनी पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं होत. शिंदे आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. अमित शाह हे देशसेवेसाठी समर्पित आहेत राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे.’ यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली होती.
एकनाथ शिंदेंनी दिले होते स्पष्टीकरण
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘पुण्यातील गुजराती बांधवांनी एक कॉम्प्लेक्स उभारलं आहे. याचं आज लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणतो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभुमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हटलो.’