पुणे, ता. १९ : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे देण्यात येणारा यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. २२) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ नेते व यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, लेखक प्राजक्त देशमुख व धैर्यकन्या आसावरी जगदाळे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सेंटरच्या पुणे केंद्राचे सचिव अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या राज्यातील सहा यशस्विनींची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे काकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमात, लेखिका श्यामला गरुड (छत्रपती संभाजीनगर) यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्था चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही मनीषा पवार (गडचिरोली) यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, वंचित व असंघटित श्रमिकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या उल्का महाजन (रायगड) यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, विविध माध्यमातून पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या अलका धुपकर (मुंबई) यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, महिलांना सोबत घेऊन शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या कमल कुंभार (धाराशीव) यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’, कुस्ती या खेळातील महिला प्रशिक्षक शबनम शेख (अहिल्यानगर) यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे, असे काकडे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.