ज्ञानासह शालेय उपक्रमांचा लाभ घ्या
का. आ. सामंतः कुडाळ हायस्कूलमध्ये गुणगौरव, साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २०ः पुस्तकी ज्ञानाबरोबरच शाळेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगती साधावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष का. आ. सामंत यांनी कुडाळ हायस्कूल येथे आयोजित शालेय साहित्य वाटप व गुणगौरव कार्यक्रमात केले.
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाजी घोगळे व राजेंद्र परब, अरविंद शिरसाट, सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, रंजन तेली आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक वराडे यांनी विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात दहा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने रुद्र कानडे व रमा सामंत या विद्यार्थ्यांनी तर पालक प्रतिनिधी मीनल पिंगुळकर व तेजल रावले यांनी मनोगत व्यक्त केले. नुकताच निकाल घोषित झालेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेल्या पाचवीच्या सहा व आठवीच्या चार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेमध्ये मुलांच्या संख्यावाढीचा विशेष प्रयत्न करणाऱ्या चंद्रशेखर गोसावी व एकनाथ जाधव या शिक्षकांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिवाजी घोगळे यांनी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन केले. राजेंद्र परब यांनी मोबाईलचा योग्य वापर यावर विद्यार्थी व पालक यांची जबाबदारी या विषयी भाष्य केले. कार्यक्रमांमध्ये मृदा सावंत, वरदा वारंग, सुखी सामंत, श्रावणी कोरगावकर या विद्यार्थिनींनी गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांना अतुल उमळकर (तबला), दुर्वांकुर घाडी (सिंथेसायझर), स्वरांगी गोठोस्कर (साईड रिदम) यांनी संगीत साथ दिली. निखिल ओरोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम सहकार्य केले. सूत्रसंचालन सुरेंद्र गोसावी यांनी केले. आभार प्रवीण भोगटे यांनी मानले.