बांगलादेश संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कसोटी मालिक खेळत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना पाचव्या दिवसाच्या खेळानंतर अनिर्णित राहिला आहे. गॉलला झालेला हा सामना श्रीलंकन क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी मात्र भावनिक ठरला.
श्रीलंका संघाचे कसोटीत १६ वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूने या सामन्यानंतर निवृत्ती घेतली. हा खेळाडू म्हणजे ३८ वर्षेीय अँजेलो मॅथ्यूज.
Why Virat Kohli Retire? विराटच्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयाचे 'कारण' Ravi Shastri यांनी सांगितले; म्हणाले, त्याने मला कॉल केला अन्...मॅथ्यूजने गेल्या महिन्यातच घोषित केलं होतं की तो गॉलमधील पहिल्या कसोटीनंतर निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे या सामन्याला भावनिक जोड मिळाली होती. त्याला दोन्ही संघांकडून गार्ड ऑफ ऑनरही मिळाला.
या सामन्यात शेवटच्या दिवशी चौथ्या डावात फलंदाजी करताना मॅथ्यूज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. पण तो ४५ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. त्याला तैजूल इस्लामने ८ धावांवर झेलबाद केले. यासह अँजेलो मॅथ्यूजची कसोटी कारकिर्द संपली. तो बाद झाल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी त्याच्याजवळ येत त्याचे अभिनंदन केले.
पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४९५ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेने चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात सर्वबाद ४८५ धावा केल्या, पण तरी त्यांना १० धावांची पिछाडी मिळाली.
दुसऱ्या डावात बांगलादेशने ६ बाद २८५ धावांवर डाव घोषित करत २९६ धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्रीलंकेने ४ बाद ७२ धावा केलेल्या असताना सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यानंतर अँजेलो मॅथ्यूज म्हणाला, 'जेव्हापासून मी निवृत्ती घोषित केली, मला विश्वास बसत नाही इतकं प्रेम मला मिळालं. मला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा सोपा प्रवास नव्हता, अनेक चढ-उतार आले. आता युवा खेळाडूंकडे श्रीलंकेला पुढे नेण्यासाठी बॅटन सोपवण्याची वेळ आली आहे.'
मॅथ्यूजने सांगितले की 'इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये विजय मिळवणे आणि श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणे, हे अविस्मरणीय क्षण होते. मी माझ्या सर्व संघसकारी, प्रशिक्षक आणि चाहत्यांबद्दल कृतज्ञ आहे.'
Piyush Chawla Retires : भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती! आयपीएलचेही जेतेपद नावावरमॅथ्यूजने २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध गॉलमध्येच कसोटी पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत ११९ कसोटी सामने खेळले असून ४४.४० च्या सरासरीने १६ शतके आणि ४५ अर्धशतकांसह ८२१४ धावा केल्या. तसेच त्याने ३३ विकेट्सही घेतल्या.
मॅथ्यूजने श्रीलंका संघाचे ३४ कसोटी सामन्यात नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेने १३ सामन्यात विजय मिळवले आणि १५ सामने पराभूत झाले. तसेच ६ सामने अनिर्णित राहिले. त्याच्याच नेतृत्वात श्रीलंकेने २०१४ मध्ये इंग्लंडविुद्ध प्रसिद्ध हेडिंग्ले कसोटी जिंकली होती.