ENG vs IND,1st Test: बुमराहचा तिखट मारा, पण पोपच्या शतकामुळे इंग्लंडचा पलटवार; तरी भारताकडे दुसऱ्या दिवसअखेर मोठी आघाडी
esakal June 22, 2025 08:45 AM

इंग्लंड आणि भारत संघात शुक्रवारी (२० जून) हेडिंग्लेमध्ये सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत रोमांचक खेळ पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करताना दिसत आहेत.

पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व राहिले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र इंग्लंडचे वर्चस्व दिसून आले. तरी दुसऱ्या दिवस अखेरीस इंग्लंड अद्याप २६२ धावांनी पिछाडीवर आहे. पण हा दिवस इंग्लंडसाठी ऑली पोपने गाजवला. त्याने शतकी खेळी केली.

ENG vs IND, 1st Test: जैस्वाल, गिल, पंत तिघांची शतकं, २३ वर्षांनी घडला योगायोग; भारताच्या पहिल्या डावात साडेचारशे धावा पार

या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात ८६ व्या षटकापासून आणि ३ बाद ३५९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी रिषभ पंत ६५ धावांवर आणि शुभमन गिल १२७ धावांवर नाबाद होते. या दोघांनी दुसऱ्या दिवशीही सुरुवात चांगली केली. त्यांनी द्वीशतकी भागीदारीही पूर्ण केली.

या भागीदारीदरम्यान, पंतनेही त्याचे ७ वे कसोटी शतक पूर्ण केले. यावेळी कर्णधार शुभमन गिल दीडशतक करेल असं वाटत होतं, पण तो १०२ व्या षटकात शोएब बाशीरविरुद्ध खेळताना जोश टंगकडे झेल देत १४७ धावांवर बाद झाला. त्याने २२७ चेंडूत ही खेळी करताना १९ चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्यापाठोपाठ करुण नायरला शून्यावर बेन स्टोक्सने बाद केले. करुणचा अफलातून झेल ऑली पोपने घेतला.

आक्रमक खेळ करत असलेला रिषभ पंतही १०८ व्या षटकात जोश टंगविरुद्ध पायचीत झाला. त्याने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूर (१), जसप्रीत बुमराह (०), रवींद्र जडेजा (११) आणि प्रसिद्ध कृष्णा (१) हे झटपट बाद झाले. त्यामुळे भारताचा पहिला डाव ११३ षटकात ४७१ धावांवर संपला.

या डावात भारताकडून पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली होती. केएल राहुलने ४२ धावा केल्या होत्या, तर साई सुदर्शन शून्यावर बाद झाला होता.

इंग्लंडकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना जोश टंग आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तसेच शोएब बशीर आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर इंग्लंडचा संघ त्यांच्या पहिल्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. पण इंग्लंडला पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने मोठा धक्का दिला. त्याने झॅक क्रावलीला ४ धावांवर करुण नायरच्या हातून झेलबाद केले. त्यानंतरही त्याने सलामीवीर बेन डकेट आणि ऑली पोपला सातवले. त्यातच १५ धावांवर असताना डकेटचा झेल रवींद्र जडेजाकडून सुटला.

नंतरही भारतीय क्षेत्ररक्षकांकडून झेलच्या संधी सुटल्या. याचा फायदा डकेट आणि पोप यांनी घेतला. त्यांनी १२२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनीही अर्धशतके केली होती. पण अखेर त्यांची भागीदारीही बुमराहनेच तोडली. त्याने डकेटला २९ व्या षटकात त्रिफळाचीत करत माघारी धाडले. डकेटने ९४ चेंडूत ९ चौकारांसह ६२ धावांची खेळी केली.

ENG vs IND, 1st Test: शतके तीन अन् विक्रम अनेक! गिल, पंत, जैस्वाल दिग्गजांच्या पंक्तीत; मोडले १० मोठे रेकॉर्ड

पण त्यानंतरही पोपला अनुभवी फलंदाज जो रुटची साथ मिळाली. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान पोपने त्याचे शतक पूर्ण केले. पण त्याच्या शतकानंतर जो रुट बाद झाला. रुटलाही बुमराहनेच करूण नायरच्या हातून झेलबाद कले. रुटने ५८ चेंडूत २८ धावा केल्या. त्यानंतर हॅरी ब्रुक मैदानात आला होता.

दिवसाचे शेवटचे षटक नाट्यमय ठरले. ब्रुकला ४९ व्या षटकात बुमराहने सतावले होते. याचदरम्याने त्याने त्याला शून्यावर बादही केले, पण तो चेंडू नो-बॉल ठरला. त्यामुळे ब्रुकला जीवदान मिळाले. दरम्यान, दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडने ४९ षटकात ३ बाद २०९ धावा केल्या. इंग्लंडच्या पहिल्या तिन्ही विकेट्स बुमराहने घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.