Killedharur Crime : मुलगा जिवंत पाहिजे असेल तर पन्नास हजार टाका; अवघ्या काही तासात पोलिसांनी केले दोन आरोपीला जेरबंद
esakal June 22, 2025 04:45 AM

किल्लेधारूर - उसने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे प्रती दिवस हजार रुपये व्याजासह ८० हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे चौघा जणांनी अपहरण करत, मुलगा जिवंत पाहिजे असेल तर, आताचे आता पन्नास हजार रुपये टाका नसता तो तुम्हाला दिसणार नाही.

अशी धमकी अपहरण कर्त्याच्या आईला देत त्याला जबर मारहाण केल्याची घटना ता. १९ गुरुवारी धारूर तालुक्यात घडली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे तर दोघेजण फरार आहेत.

धारूर तालुक्यातील मैदवाडी येथील कृष्णा मैंद याने धनराज चाटे, पृथ्वीराज राख, परमेश्वर आघाव व अन्य एकाकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. त्या दहा हजार रुपयांचे व्याजासह ८० हजार रुपये झाल्याचे कारण सांगत या चौघांनी कृष्णाला त्याच्या घरी जाऊन सोबत घेतले यानंतर त्याला काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसवत अंबाजोगाई कडे घेऊन गेले.

त्या ठिकाणाहून कृष्णा याने घरी फोन लावत झालेल्या प्रकाराची माहिती त्याच्या आईला दिली. यावेळी त्यांच्यापैकी एकाने कृष्णाच्या आईला तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आत्ताच्या आता पन्नास हजार रुपये पाच मिनिटात टाका नाही तर तुम्हाला तुमचा मुलगा दिसणार नाही असे म्हणत फोन कट केला.

यानंतर कृष्णाच्या आईने गावातील इतर लोकांच्या मदतीने धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी तातडीने सूत्रे हलवत तपास सुरू केला. यावेळी आरोपी हे अंबाजोगाई परिसरात असल्याचे लक्षात आले त्यानुसार त्या ठिकाणी कारवाई करत पृथ्वीराज राख व परमेश्वर आघाव या दोघांना ताब्यात घेतले तर धनराज चाटे व अन्य एक जण फरार झाला.

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या चौघांनी कृष्णा याला मारहाण करत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रोडवर जखमी अवस्थेत सोडले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अंबाजोगाई रुग्णालयात शोध घेतला असता त्या ठिकाणी कृष्णा हा उपचार घेत असताना आढळून आला.

या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आले असून त्यांनी कृष्णा मैंद याला दहा हजार रुपये एक हजार रुपये रोजाप्रमाणे दिले होते. त्याबद्दल त्याच्याकडे ८० हजार रुपये झाले होते व त्याने रोख तीस हजार रुपये दिल्यानंतर ही पन्नास हजार रुपये बाकी असल्याने त्याला उचलून आणले होते असे त्याने सांगितले. या प्रकरणात न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.