Chh. Samhiaji Nagar News : बंबाटनगरात पाणीपुरवठा योजनेतील आणखी एक अडथळा दूर
esakal June 22, 2025 05:45 PM

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी योजनेसाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेसोबतच पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. देवळाईतील पटेल कॉलनीत पोलिस आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर शनिवारी (ता. २१) बीड बायपासवरील बंबाटनगरात त्याची पुनरावृत्ती झाली. याठिकाणी नागरिकांनी आठ महिन्यांपासून रोखलेले काम पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहताच सुरू झाले. बंबाटनगरातून मुकुंदवाडी भागात १३०० मिलिमीटर व्यासाची मोठी पाइपलाइन टाकली जात आहे.

शहरातील नागरिक एकीकडे पाणी टंचाईने त्रस्त असताना दुसरीकडे नव्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामात जागोजागी अडथळे आणले जात आहेत. शहराची पाण्याची निकड पाहता हे काम न्यायालयाच्या आदेशानुसार केले जात आहे. तसेच ‘सकाळ’च्या ‘कुठेय पाणी?’ वृत्तमालिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेत कामात अडथळा आणणाऱ्यांचा बंदोबस्त करा, असे आदेश दिले आहेत.

त्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार स्वतः रस्त्यावर उतरले असून, दोन दिवसांपूर्वी पटेलनगर भागात विरोध करणाऱ्यांना त्यांनी तंबी दिली होती. अशाच प्रकारे बंबाटनगरात आठ महिन्यांपासून पाइपलाइनचे काम रोखण्यात आले होते. शनिवारी दुपारी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता किरण पाटील, महापालिकेचे समन्वयक ए. बी. देशमुख, के. एम. फालक, जीव्हीपीआर कंपनीचे महेंद्र गुगथेलू, खलील खान, पीएमसीचे देशमुख यांच्यासह पोलिसांचा ताफा बंबाटनगरात दाखल झाला.

पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहताच येथील प्लॉटधारकांनी आमचा विरोध नसल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने जलवाहिनी टाकण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली. अवघ्या चारशे मीटर जागेमुळे याठिकाणी १३०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन थांबली होती.

Chh. Samhiaji Nagar News : गारखेड्यातील भगतसिंगनगरात १५ तोळे सोने चोरीला एका संस्थेवर तीन संकटे

गारखेडा गटनंबर ३४/२ मध्ये ललित सहकारी सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. त्यात ३२ जणांचे २ एकर २ गुंठे जमिनीत प्लॉट होते. मात्र विकास आराखड्यात या जागेवर शाळेचे आरक्षण टाकण्यात आले. तसेच २४ मीटरचा रस्ताही टाकण्यात आला आहे. त्यातून आता पाइपलाइन टकली जात असल्याने गृहनिर्माण संस्थेकडे कमी जागा राहते. त्यातून तोडगा काढण्यात आला. याच भागात शिवरस्त्यावरून सेंटर घेऊन पाइपलाइन टाकण्याची नागरिकांची मागणी होती. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्यातून मार्किंग करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.