Ashadhi Wari 2025 : 'शेगावीच्या राणा'चे अंबानगरीत स्वागत; अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरात दुमदुमली अंबाजोगाई
esakal June 22, 2025 05:45 PM

अंबाजोगाई : शेगाव येथून पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (ता. २१) दुपारी अंबानगरीत उत्साहात आगमन झाले. विठूनामाचे अभंग व ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात शहर परिसर दुमदुमला होता.

हाती भगव्या पताका घेऊन सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे शहरवासीयांनी संत भगवानबाबा चौकात उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी महिलांनी दारोदारी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. योगेश्वरी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर महिलांनी साड्यांच्या पायघड्या घालून पालखीला योगेश्वरी मंदिराकडे मार्गस्थ केले.

शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, मंडी बाजारमार्गे पालखी दुपारी साडेचारला योगेश्वरी देवीच्या मंदिरात पोचली. तिथे आरती होऊन पालखीत सहभागी वारकऱ्यांनी महाप्रसाद घेतला. थोड्याशा विश्रांतीनंतर सायंकाळी पालखी गुरुवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोंढा मार्गे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मुक्कामासाठी विसावली. परंपरेनुसार शहरातील व्यापाऱ्यांच्यावतीने महाप्रसाद झाला. पालखी मार्गात विविध संस्था व भक्तांनी वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी, फळे व चहाची सोय केली होती.

आज होणार प्रस्थान

शनिवारी रात्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. रात्रीच्या विसाव्यानंतर रविवारी सकाळी पालखीचे विधिवत पूजन व आरती होऊन पुढील मार्गाच्या दिशेने प्रस्थान होईल.

महसूल दिंडी

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार महसूल दिंडी काढण्यात आली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होताच, महसूल प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे (जिरंगे), तहसीलदार विलास तरंगे यांनी त्यांचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. या महसूल दिंडीत जनतेच्या माहिती जनजागृतीसाठी विविध योजनांचे फलक घेऊन महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.

Fee Registration : शुल्क नोंदणीला शाळांची टाळाटाळ; आरटीई, नोंद न केलेल्या शाळांवर कारवाई, विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

त्यात ॲग्रिस्टॅक, सस्ती आदालत, जनता दरबार, जिवंत सातबारा याबाबत जनजागृती करण्यात आली. तहसील कार्यालयापर्यंत ही दिंडी सुरू होती. त्यात तहसीलदारांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे हाती टाळ घेऊन वारकऱ्यांसोबत सहभागी झाले. या दिंडीतील भक्तिमय वातावरणात अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे व नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांनी विठ्ठल नामाच्या जयघोषात फुगडीचा आनंद घेतला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.