
आघाडीवर असलेल्या ग्रॅण्डमास्टर ललित बाबू (भारत) आणि इंटरनॅशनल मास्टर आर्सेन दावत्यान (आर्मेनिया) यांच्यात बरोबरी झाल्याने ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीनंतर अन्य खेळाडूंना आघाडीवर जाण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. सहा फेऱ्यांनंतर पाच खेळाडू प्रत्येकी 5.5 गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम आहे. ग्रॅण्डमास्टर विभागातील आणखी एक धक्कादायक निकाल म्हणजे इंटरनॅशनल मास्टर नायक बुद्धिधर्म (इंडोनेशिया) याने अव्वल मानांकित ग्रॅण्डमास्टर लेवन पंतसुलिया (जॉर्जिया) याला बरोबरीत रोखले. अन्य बोर्डवर ग्रॅण्डमास्टर मॅन्युएल पेट्रोस्यानने (आर्मेनिया) अलेक्झांडर स्लिझेव्हस्कीविरुद्ध (रशिया) पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना बाजी मारली. ग्रॅण्डमास्टर अलेक्सेज अलेक्झांड्रोव्हने (बेलारुस) देखील ग्रॅण्डमास्टर लुका पायचाडझे (जॉर्जिया) याला पराभूत करून टॉप खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. 13 वर्षांखालील गटात एफएम अंश नेरुरकर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर मधेश कुमार यांनी आपापले डाव बरोबरीत सोडवून अपराजित वाटचाल कायम राखली.