हत्तीची राणी परबती बरुआ: हस्टी कन्या – पार्वती बरुआ
Marathi June 23, 2025 02:25 PM

साधारणपणे हत्तींवर नियंत्रण ठेवणाऱ्या माहुंतामध्ये सामान्यत: पुरुष दिसतात. पण, आज आपण अशा एका स्त्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने सर्व जुन्या विचारांना मागे सारत देशातील पहिली महिला माहूत बनण्याचा मान मिळवला आहे. पार्वती बरुआ असे या महिला माहुतचे नाव आहे, ज्यांना हस्ती कन्या किंवा हत्तींची राणी या नावाने ओळखले जाते. आजपर्यंत त्यांनी जंगली हत्तींना हाताळण्यात आणि त्यांना पकडण्यात तीन राज्य सरकारांना मदत केली आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान (प्राणी कल्याण) पाहून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जाणून घेऊयात, हस्ती कन्या पार्वती बरुआ यांच्याविषयी,

पार्वती बरुआ या गुवाहाटी, आसाम येथील आहेत. पुरुषप्रधान व्यवसायात त्यांनी स्वत:चे एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पार्वती यांचे वडिल एक प्रसिद्ध हत्ती तज्ज्ञ होते. लहानपणापासून त्यांच्या आसपास हत्ती राहिल्याने त्यांना हत्तीची आवड निर्माण झाली असे त्या सांगतात. पार्वती या लहानपणी हत्तींसोबत खेळायच्या. वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांनी हत्तींना आपला लळा लावत तालावर नाचायला शिकवले होते. हत्ती निष्ठांवत, प्रेमळ आणि शिस्तबद्ध प्राणी आहे असे त्या सांगतात.

पार्वती हत्तींशी संबंधित संस्थांशी जोडलेल्या आहेत. त्या एशियन एलीफंट स्पेशालिस्ट, IUCN च्या सदस्य आहेत. पार्वती बरुआ यांच्या जीवनावर आधारीत एक डॉक्यूमेंट्री बनवण्यात आली आहे, ज्याचे नाव ‘क्वीन ऑफ द एलिफेंट्स’ असे आहे. कोलकत्ता इंटरनॅशनल वाइल्डलाइफ एंड एनवायर्नमेंटल फिल्म फेस्टिवलने त्यांना ‘lifestyle Achievement Award’ ने सन्मानित केले आहे. पार्वती बरुआ यांची पार्श्वभूमी तशी श्रीमंत आहे. पण, त्यांनी साधं जीवन जगणे पसंत केलं असून हत्तींच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित केले आहे.

हत्तींना पकडण्याची आणि त्यांना हाताळण्याची ही परंपरा केवळ आसाममध्ये आहे, असे त्या कायम सांगतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांनी स्वत:ला कधीच कमी समजू नये, एखाद्या महिलेने ठरवले तर ती काहीही करु शकते, कोणतेही काम करू शकते. असे त्या सांगतात. त्यांचा हा प्रवास सर्वच महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.