इराकी नॅशनल व्हिसाशिवाय भारतात प्रवास केल्याबद्दल अटक
Marathi June 23, 2025 05:25 PM

वृत्तसंस्था/ रक्सौल

भारत-नेपाळ सीमेवरील रक्सौल सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत इराकी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. 47 वर्षीय इराकी नागरिक व्हिसाशिवाय नेपाळमार्गे भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होता. प्रारंभिक तपासात तो यापूर्वी दोनवेळा भारतात आल्याचे समोर आले आहे. परंतु यावेळी तो व्हिसा नसतानाच भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव फौजी हामिद अल बयाती असून तो बगदादच्या अल दोरा क्षेत्राचा रहिवासी आहे. या संशयिताला पोलिसांनी नियमित तपासणीदरम्यान पकडले आहे. त्याच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी वैध व्हिसा नव्हता असे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले.

इराकी नागरिक नेपाळमार्गे भारतात अवैध मार्गाने शिरू पाहत होता. सखोल तपासासाठी त्याला सुरक्षा यंत्रणांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. फौजी हामिद एक मॅकेनिकल  इंजिनियर असून तो यापूर्वी दोनवेळा वैधमार्गाने भारतात आला होता. परंतु यावेळी त्याला रक्सौल सीमेवर ताब्यात घेण्यात आले.

फौजी हामिद हा भारतातून कामगारांना इराकमध्ये नेणाऱ्या नेटवर्कशी संबंधित असू शकतो असे तपास यंत्रणांचे मानणे आहे. अवैधमार्गाने भारतात दाखल होण्यामागे त्याचा हेतू काय होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने याचा वरिष्ठ स्तरावरून तपास केला जात असल्याची माहिती मोतिहारीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.