टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक करण्यापासून वंचित राहिला. केएलचं अर्धशतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. मात्र केएलने दुसऱ्या डावाच चौथ्या दिवशी निर्णायक क्षणी अर्धशतक पूर्ण केलं. केएलने लीड्समध्ये या अर्धशतकासह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. केएलने टीम इंडियाचा माजी आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकलं आहे. केएलने नक्की कशाबाबत सेहवागला मागे टाकलंय? सविस्तर जाणून घेऊयात.
केएलने 29 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 2 रन्स घेतल्या. केएलने अशाप्रकारे 7 चौकारांच्या मदतीने 57.47 च्या स्ट्राईक रेटने 87 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. केएलच्या कसोटी कारकीर्दीतील हे 18 वं अर्धशतक ठरलं. तसेच केएलचं सेना देशातील ओपनर म्हणून हे नववं कसोटी अर्धशतक ठरलं. केएलने यासह सेना देशात वेगवान 9 अर्धशतकांबाबत भारतीय सलामीवीर म्हणून माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकलं. तसेच मुरली विजयची बरोबरी केली. केएलने 42 व्या डावात ही कामगिरी केली. तर सेहवागने 49 डावांत सेना देशात 9 अर्धशतकं केली होती.
टीम इंडियाकडून सलामीवीर म्हणून सेना देशात सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम हा दिग्गज सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी 57 डावांमध्ये 19 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यानंतर केएल आणि मुरली विजय दोघेही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. दोघांनीही 42 डावात 9 अर्धशतकं केली आहेत.
तसेच केएलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी 20) 50 पेक्षा अधिक धावा करण्याची 75 वी वेळ ठरली. केएलने कसोटीत 26, वनडेत 25 तर टी 20 मध्ये 24 पेक्षा अधिक वेळा ही कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कसोटी निवृत्तीनंतर केएल राहुल टीम इंडियातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. केएलने 2014 साली कसोटी पदार्पण केलं आहे. त्यामुळे केएलवर रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर मोठी जबाबदारी असणार आहे. केएल इंग्लंडमध्ये यशस्वी राहिला आहे. त्यामुळे केएलकडून या सामन्यात मोठी खेळीची अपेक्षा असणार आहे.
दरम्यान केएल राहुल याने इंग्लंड विरुद्ध या अर्धशतकी खेळी दरम्यान खास कामगिरी केली. केएलने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 1 हजार धावा पूर्ण केल्या.