अमेरिकेनं इराणच्या आण्विक कार्यक्रमांशी संबंधित तीन ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हे जाहीर केलं. इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले आहेत.
ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहानसह इराणच्या तीन अणु ठिकाणांवर आम्ही यशस्वी हल्ले केले आहेत. आमची सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत."
ट्रम्प यांनी पुढं असंही म्हटलं, "फोर्डोवर बॉम्ब टाकण्यात आले असून सर्व विमानं सुरक्षितपणे अमेरिकेत परत येत आहेत."
"अमेरिकेच्या सैनिकांचे अभिनंदन. अशी कारवाई करू शकेल अशी जगात दुसरी कोणतीही लष्करीशक्ती नाही. आता शांततेचा काळ आहे," असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
इराणमधील लष्कराच्या या यशस्वी मोहिमेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करत माहितीही दिली.
तेलाच्या किंमती वाढणार?जगभरातील तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित बाजार (एनर्जी मार्केट) उघडतील तेव्हा आशियातील तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
क्रिस्टॉल एनर्जीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कॅरोल नाखले यांनी बीबीसीला सांगितलं की, 'अमेरिकेच्या हल्ल्यामुळे हा संघर्ष एका मोठ्या पातळीवर पोहोचला आहे, अनेकांना असं वाटतंय की या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखीन वाईट होऊ शकते.'
त्या पुढे म्हणाल्या, "या हल्ल्यामुळे तयार झालेली भीती तेलाच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरेल. आता नेमकी किती भाववाढ होईल हे सांगता येणार नसलं तरी ही भीती जेवढी जास्त असेल तेवढीच तेलाची किंमत देखील वाढले."
क्रूड ऑईलच्या किमतीमध्ये मागच्या महिन्यात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 77.01 डॉलर एवढी होती.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनसुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची तेलाची किंमत कमीच आहे. तुमच्या गाडीत टाकायच्या पेट्रोलपासून ताटात येणाऱ्या अन्नपर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत कच्च्या तेलांच्या किमतीवर अवलंबून असते.
'वाटाघाटी करा, अन्यथा भविष्यात मोठे हल्ले' -ट्रम्पडोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणात फोर्डो, नतांझ आणि इस्फहान याठिकाणच्या आण्विक ठिकाणांवरील हल्ल्यांबाबत माहिती दिली. काही वेळापूर्वीच हल्ले केल्याचं ट्रम्प म्हणाले.
इराणने आता वाटाघाटी करावी, असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
"त्यांनी तसं केलं नाही, तर भविष्यात होणारे हल्ले हे अधिक मोठे आणि खूप सोपे असतील," असंही ते म्हणाले.
"त्यांनी याठिकाणी विनाशकारी बांधकामं केली असताना सर्वांनी अनेक वर्षांपासून ही नावं ऐकली होती.
पण त्याठिकाणी केलेले हल्ले यशस्वी झाल्याचं मी आज जगाला सांगू इच्छितो," असंही ट्रम्प म्हणाले.
इराणचे माजी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांनी हजारो लोकांची हत्या केली असल्याचंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
"मी हे होऊ देणार नाही असं खूप आधी ठरवलं होतं," असंही ट्रम्प म्हणालेत.
त्याचबरोबर ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांचंही अभिनंदन केलं. इस्रायलला असलेला हा भयावह धोका संपवण्यासाठी एकजुटीने काम केल्याचं त्यांनी म्हटलं.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस काय म्हणाले?संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिकेनं केलेल्या इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.
"अमेरिकेनं आज इराणच्या विरोधात केलेल्या लष्करी कारवाईने मी चिंतित आहे. आधीच संवेदनशील असलेल्या त्या भागामध्ये यामुळं तणाव आणखी वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी हा थेट धोका आहे," अशी पोस्ट त्यांनी केली.
"हा संघर्ष वेगानं नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांसह हा परिसर आणि संपूर्ण जगाला फटका बसू शकतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.
गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना परिस्थिती आणखी बिघडण्यापासून वाचवण्याची आणि यूएन चार्टर तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्याची विनंती केली आहे.
"या संकटावर काहीही तोडगा नाही. वाटाघाटी हाच पुढं जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शांतता हीच एकमेव आशा आहे," असं त्यांनी म्हटलं.
कसा केला हल्ला ?इराणच्या आण्विक ठिकाणांवर झालेल्या या हल्ल्यादरम्यान इस्रायलनं अमेरिकेबरोबर संपूर्ण समन्वय ठेवला होता.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इस्रायलची सरकारी प्रसारण संस्था 'केन' बरोबर बोलताना एका इस्रायली अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, इराणवर अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात बी-2 बॉम्बर्सचा समावेश आहे.
दरम्यान, यापूर्वी अमेरिकेनं यूएस बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सना ग्वाम बेटावर पाठवलं असल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या.
त्यानंतर अमेरिका इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतं, असे अंदाज वर्तवले जात होते.
ईराणने काय म्हटले?दरम्यान, इराणच्या सरकारी वाहिनीचे डेप्युटी पॉलिटिकल एडिटर हसन अबेदिनी यांन केलेल्या दाव्या नुसार, इराणच्या अण्विक ठिकाणांवर हल्ला होण्याआधीच ते रिकामे करण्यात आले होते, असा दावा केला आहे.
ट्रम्प जे बोलत आहेत ते खरं असलं तरी, इराणला 'कोणत्याही मोठ्या स्फोटानं काही नुकसान झालेलं नाही. कारण याठिकाणाहून साहित्य आधीच हटवण्यात आलं होतं.'
तस्नीम या वृत्त संस्थेनुसार, कौम प्रांतातील आपत्ती व्यवस्थापन प्रवक्ते हैदरी यांनी म्हटलं की, "फोर्डो आण्विक केंद्राच्या परिसरातील एका भागाचं हवाई हल्ल्यात नुकसान झालं आहे."
तसंच इस्फहानचे सेक्युरिटी डेप्युटी गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नतांझ आणि इस्फहानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. तिथल्या अणुस्थळांच्या जवळ हल्ले झाल्याचं आम्ही पाहिलं."
या माहितीमुळं ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या तिन्ही ठिकाणी हल्ला झाल्याच्या वृत्ताला इराणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
हल्ल्यानंतर ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात चर्चाअमेरिकेनं इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
बीबीसीच्या अमेरिकेतील सहयोगी सीबीएसने व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अमेरिकेनं या हल्ल्यापूर्वी इस्रायलला याबाबत पूर्वकल्पना दिली होती, असंही सूत्रानं सीबीएसला सांगितलं.
संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात GBU-57A या बंकर बस्टर बॉम्बचा हल्ल्यात वापर करण्यात आला होता.
इराण अमेरिकेला कसं प्रत्युत्तर देऊ शकतो?ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनं इस्रायलवर पुन्हा ड्रोन आणि मिसाईल्स दागली आहेत. पण अमेरिकेविरोधात ते काय पावलं उचलू शकतात?
बीबीसीचे सुरक्षाविषयक वार्ताहर आणि पश्चिम आशियाचे तज्ज्ञ फ्रँक गार्डनर यांच्या मते, इराणकडे आता तीन पर्याय आहेत.
पहिला पर्याय म्हणजे काहीच करायचं नाही. त्यामुळे अमेरिकेकडून आणखी हल्ले होणार नाहीत. इराण अमेरिकेसोबत वाटाघाटींचा मार्गही स्वीकारू शकतो. पण अमेरिकेसमोर इराणचे राष्ट्रप्रमुख कमजोर झाल्यासारखं वाटण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होते.
अमेरिकेनं आणखी हल्ले केले, तर त्यानं होणारं नुकसान सहन करायचं की आपल्या नागरिकांवरची पकड ढिली होऊ द्यायची यातून एक मार्ग इराणला निवडावा लागेल.
दुसरा पर्याय म्हणजे लवकरात लवकर आणि कठोर प्रत्युत्तर देणे. इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्सचा भरपूर मोठा साठा आहे, जो त्यांना अनेक वर्षांपासून तयार केला आहे.
मध्य पूर्वेत अमेरिकेचे साधारण वीस लष्करी तळ आहेत, त्यातल्या काही तळांवर इराण हल्ला करू शकतो. अमेरिकन नौदलाच्या बोटींवर इराण ड्रोन आणि टॉर्पिडो बोट्स वापरून स्वार्म अटॅक करू शकतो.
तिसरा पर्याय म्हणजे थोडं थांबून इराण त्यांच्या मर्जीच्या जागी आणि वेळी हल्ला करू शकतो. सध्या अमेरिकेच्या तळांवर हाय अलर्ट आहे. पण सध्याचा ताण थोडा कमी होईल, तेव्हा इराण अमेरिकेवर सरप्राईज हल्ला करू शकतो.
इराणचं सहकार्य असलेले गट आणि संघटनाही इराणच्या अशा कारवाईत सहभागी होऊ शकतात.
डेमोक्रॅट नेत्यांचा विरोधदरम्यान, अमेरिकेतील काही डेमोक्रॅट नेत्यांनी या हल्ल्यावर टीका केली आहे. डेमोक्रॅटिक सिनेटर बर्नी सँडर्स यांनी हा हल्ला पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे.
देशाच्या युद्धासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार फक्त अमेरिकन काँग्रेसकडे आहे, राष्ट्राध्यक्षाला नाही असं सँडर्स म्हणाले.
अमेरिकन हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील नेते हकीम जेफ्रीज यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यामुळं युद्धाचा धोका प्रचंड वाढला आहे, असं म्हटलं.
तर काँग्रेस सदस्य अॅलेक्झँड्रिया ओकॅसिओ-कोर्तेझ यांनीही याला घटनाबाह्य म्हटलं आहे. काँग्रेस सदस्य जिम मॅकगव्हर्न यांनी हा वेडेपणा असल्याची टीका केली आहे.
केंटकीचे रिपब्लिकन सिनेटर थॉमस मॅसी यांनी ही कृती घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप ट्रम्प 'अमेरिका फर्स्ट' धोरण विरोधी असल्याची भूमिका ते काही दिवसांपासून मांडत आगेत.
एकिकडे रिपब्लिकन सिनेटर टीका करत असताना पेन्सिल्व्हेनियाचे डेमोक्रॅट सिनेटर आणि इस्रायलचे समर्थक जॉन फेटरमन यांनी एक्सवर पोस्ट करत याला पाठिंबा दर्शवला.
"राष्ट्राध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.इराण दहशतवादाचा जगातला सर्वात मोठा पुरस्कर्ता आहे. त्यांच्याकडे अण्वस्त्र असता कामा नये," असं ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.