इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 350 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयी सलामी देण्यासाठी 10 विकेट्स हव्या आहेत. त्यामुळे कोणता संघ या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विजयी आघाडी घेणार? हे पाचव्या आणि अंतिम दिवशी स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने आतापर्यंत सामन्यात काय काय झालं? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने पहिल्या डावातील 6 धावांच्या आघाडीनंतर दुसर्या डावात ऑलआऊट 364 रन्स केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान मिळालं. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 6 ओव्हरमध्ये 21 धावा केल्या. इंग्लंडची झॅक क्रॉली आणि बेन डकेट जोडी नाबाद परतली. भारताने इंग्लंडच्या डावात एकूण खेळ संपेपर्यंत 6 ओव्हर टाकल्या. चाहत्यांना खेळ संपेपर्यंत एखाद-दुसऱ्या विकेटची अपेक्षा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे आता पाचव्या आणि अंतिम दिवशी कोण मैदान मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियासाठी यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत या त्रिकुटाने पहिल्या डावात शतकी खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने 5 तर प्रसिध कृष्णा याने 3 विकेट्स घेत इंग्लंडला 465 रन्सवर रोखलं. टीम इंडियाने त्यानंतर दुसर्या डावात 96 ओव्हरमध्ये ऑलआऊट 364 रन्स केल्या. केएल राहुल याने 137 रन्स केल्या. तर ऋषभ पंत याने दुसऱ्या डावातही शतक केलं.
ऋषभने 118 धावांची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त इतरांनी निराशा केली. त्यामुळे भारताने 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची मोठी आघाडी घेता आली नाही. इंग्लंडने तिसऱ्या आणि अंतिम सत्रात भारताला तब्बल 7 झटके दिले. त्यामुळे इंग्लंडला 371 धावांचं आव्हान मिळालं. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स आणि जोश टंग या जोडीने सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली.
कोण जिंकणार पहिला सामना?
त्यानंतर इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट जोडीने 6 षटकांमध्ये 21 धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद परतले. क्रॉली 12 तर डकेट 9 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे आता इंग्लंड पाचव्या दिवशी 90 ओव्हरमध्ये 350 धावा करणार की भारतीय संघ 10 विकेट्स घेत 2002 नंतर लीड्समध्ये पहिला कसोटी विजय मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.