चातुर्मास म्हणजे चार महिने. वर्षाचे ऋतू सहा आहेत, असे आपण मानतो. चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू, आश्विन-कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष- पौष हेमंत ऋतू, आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू असे सर्वसाधारण ऋतुचक्र असते.
श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू असे म्हटले गेले असले तरी अलीकडचे काही दिवस व पलीकडचे काही दिवस मिळून पावसाळा साधारण चार महिने असतो. हा चार महिन्यांचा कालखंड चातुर्मास म्हणून ओळखला जातो. बहुतेक ठिकाणी चार ऋतू महत्त्वाचे समजले जातात. तीन तीन महिन्यांचे चार ऋतू अशा तऱ्हेनेही वर्षाची विभागणी केलेली दिसते.
वातावरण जसे बदलते तसे सर्वच प्राणिमात्रांमध्ये, सृष्टीमध्ये फरक पडतो. त्या दृष्टीने जीवनाच्या गणिताचे मोजमाप करावे लागते. पावसाचे महिने आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात. म्हणून पावसाळा आला रे आला की आषाढी एकादशीपासूनच काळजी घ्यायला सुरू करणे आवश्यक असते.
ही काळजी घेण्याच्या दृष्टीने या दिवसापासून सुरू झालेला चातुर्मास दीपावलीपर्यंत चालतो. चातुर्मासाचा एकूणच पाप-पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी संबंध जोडणे मनुष्याला अधिक सोयीचे वाटते कारण आचरणात आणण्यासाठी सोपे जाते म्हणून चातुर्मासाची व्रतवैकल्ये भारतीय संस्कृतीने बेतून दिलेली आहेत.
या सर्व व्रतवैकल्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे खाण्या-पिण्यावरील निर्बंध. एकदा जेवणे, सूर्यास्तापूर्वी जेवणे, अमुक वस्तू अमुक दिवशी न खाणे, सोमवारी मुगाची खिचडी न करणे, विशिष्ट दिवशी विशिष्ट पक्वान्न करणे, कुठला तरी एक दिवस चूल न पेटवणे असे नियम केलेले दिसतात. श्रावणातील ऋषिपंचमीचे व्रत म्हणजे सेंद्रिय शेतीला तसेच शेतीसाठी केलेल्या कष्टांना महत्त्व देण्याचाच एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही.
नागाची पूजा करून सर्पांना अभयदान देण्यासाठी नागपंचमी;
वडाची पूजा करून मनुष्याला पुनरुत्पत्तीसाठी व स्वतःचे शरीर नीट टिकवून सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच उन्हातान्हात सावलीसाठी वटवृक्ष एखाद्या वृद्ध आजोबांसारखा मदत करतो ही माहिती सांगण्यासाठी वटपौर्णिमा;
पावसाळ्यात बाहेरचे फिरणे कमी झाल्याने घरातल्या घरात स्वतःविषयीचा अभ्यास, अंतर्मुखता कशी साधावी यांचे ज्ञान मिळवून सद््गुरूंच्या पायी समर्पित होण्यासाठी तसेच गुरुतत्त्वाचा, ज्ञानाचा, मेंदूचा, मोठेपणाचा आदर करून त्यांना आपल्या जीवनात समाविष्ट करून घेऊन आपणही त्या लक्ष्यापर्यंत पोचू हे ध्येय डोळ्यासमोर राहण्यासाठी असलेली गुरुपौर्णिमा;
शिवभक्ती करून जीवनात सौंदर्य व शांती मिळविण्यासाठी केलेले श्रावणात श्रावणी सोमवार;
अंगाला तेल लावून स्नान व अन्नदान करण्यासाठी श्रावणातले शनिवार;
वनस्पतींची ओळख, त्यांचे घरगुती उपचार माहीत करून घेण्यासाठी (पत्री तोडताना संबंधित वनस्पतीच्या रसाचे सूक्ष्म भावाने आरोग्यप्राप्ती करून घेता येते) साजरे केलेले मंगळागौरी, हरतालिका हे सण;
लग्नापूर्वीच्या मैत्रिणींना पुन्हा एकदा एकत्र करून रात्री जागरणे व खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देऊन प्रेम वाढविण्यासाठी रात्रभर जागवलेल्या मंगळागौरी;
लोकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कार्यक्रम आयोजित करून साजरा केलेला गणेशचतुर्थीचा उत्सव;
शक्ति उपासना, कुंडलिनी जागरण व स्त्री-पुरुषांना एकत्र कार्य करता यावे या हेतूने असलेली नवरात्रातील दुर्गोपासना अशी अनेक व्रतवैकल्ये चातुर्मासात येतात.
सूक्ष्मपणे विचार केला तर या व्रतांच्या मागे असलेले विज्ञान किती अचूक आहे हे आपल्याला कळतेच पण याकडे स्थूलपणे पाहिले तरी इतर कुठली स्वर्गीय मदत मिळो, न मिळो पण आरोग्य चांगले राहण्यासाठी ह्या सर्व व्रतवैकल्यांचा उपयोग होतो हे सहज लक्षात येते.
पावसाळ्यात जाठराग्नी मंद झालेला असतो, सूर्याचे दर्शन रोज होईलच याची शाश्र्वती नसते अशा वेळी पोटाचे स्वास्थ्य सांभाळण्यासाठी श्रावणाचा एक महिना मांसाहार वा जडान्न न खाण्याचे व्रत पाळणारे भाग्यवान ठरतात.
एरवीही मांसाहार वा जडान्न पचले नाही तर मोठमोठ्या रोगांना आमंत्रण मिळते तर मग पावसाळ्यात व भर श्रावणात मांसाहार केला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील हे सांगण्यासाठी धन्वंतरीची आवश्यकता नाही. भारतीय संस्कृतीवर बाहेरून कितीही आघात झाले तरी आजही चातुर्मासातील व्रतवैकल्ये आदराने, प्रेमाने व श्रद्धेने सर्व लोक करत असतात. या व्रतवैकल्यांमुळे शरीर-मनावर होणारे फायदे ताबडतोब दिसून येतात.
विद्यापीठाच्या पातळीवर हे सर्व कुणी सिद्ध केले असेल वा नसेल पण वैयक्तिक पातळीवर ह्या व्रतवैकल्यांचा सर्वांनी अनुभव घेतलेला असतो व त्यातून मिळालेले फायदे पदरात पाडून घेतलेले असतात.
हे सर्व थोतांड आहे, याने काय होणार असे आक्षेप बऱ्याच वेळा आधुनिकतेच्या नावाखाली घेतले जातात व हे सर्व सिद्ध झालेले आहे का, कोण ह्या देवता, देवदेवतांच्या पूजा का करायची अशा शंका काढल्या जातात.
पण हेच लोक गणपती उत्सव व नवरात्र हे दोन उत्सव मात्र हिरिरीने भाग घेऊन करतात. असा आक्षेप घेणारे काही जण असले तरी सर्वसामान्यजन चातुर्मासातील व्रतवैकल्ये अवश्य करतात. त्यातील काही व्यक्तिगत कारणाने, अहंकारापायी वा एखाद्या वस्तूची उपलब्धता असल्या-नसल्यामुळे फाफटपसारा वाढू शकतो. असे होणे चांगले नाही.
तसे पाहिले तर केवळ चातुर्मासातील व्रतवैकल्येच वैज्ञानिक पायावरती, शरीर-मन व आत्म्याचे आरोग्य मिळावे व उत्कर्ष व्हावा या हेतूने तयार केलेली आहेत असे नव्हे तर वर्षात येणारे सर्व सण व व्रतवैकल्ये कुठल्या ना कुठल्या फायद्यासाठी व विशिष्ट कारणानेच आयोजित केलेली दिसतात. अगदी दीपावलीच्या वेळी केली जाणारी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा आवश्यक असते.
तुझ्या फटाक्याचा आवाज मोठा का माझ्या फटाक्यांचा, अशा स्पर्धेपायी कानठळ्या बसविणारे उखळी बॉम्बसारखे फटाके फोडणे उचित नाही. अधिक वेळ चालण्यासाठी २०-२५ हजार फटाक्यांची माळ बनविणे वगैरे अतिरेक सोडून देऊन संतुलित पद्धतीने सण साजरे केले तर त्यामागचे विज्ञान कळून येऊ शकते व त्याचे फायदे दिसतात.
भाद्रपदात येणाऱ्या गणपतीचे व्रत हे केवळ सामाजिक संमेलनापुरतेच मर्यादित नसते तर त्यात योगशास्त्राप्रमाणे असलेल्या शरीररचनेतील शक्तिउत्थापनाचे काम करता येईल अशी योजना केलेली असते.
दीपावलीचे फराळाचे पदार्थ येणाऱ्या ऋतुमानात बदललेल्या पचनसंस्थेसाठी सुचविलेले असतात.
एकूणच सर्व व्रतवैकल्यांची सांगड आरोग्याशी घातली गेली असल्यामुळे त्यांची यथासांग माहिती करून घेऊन त्यातल्या विज्ञानावर व स्वतःच्या लाभावर लक्ष ठेवून जर साजरी केली गेली तर देवाची कृपा, आरोग्यप्राप्ती व आनंदप्राप्ती होईल हे निश्र्चित !!
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)