अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मैदानावर बराच गोंधळ दिसला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात हा वाद पाहायला मिळाला. कारण ऐरव्ही शांत असणाऱ्या कर्णधार शुबमन गिलने रौद्र रूप धारण केलं होतं. त्याचं कारण ठरलं ते इंग्लंडच्या एकाच डावातील दोन सत्रात दोन वेळा चेंडू बदलण्याची वेळ आली. त्यामुळे गिलने पंचांशी वाद घातला. त्यानंतर त्याचा मूड बदलला आणि हसायला लागला. गिलचं असं वागणं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. असं नेमकं का झालं? कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जो रूटच्या शतकाने झाली. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि 37वं शतक पूर्ण केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहची आक्रमक गोलंदाजीचं दर्शन घडलं. त्याने जो रूट आणि बेन स्टोक्ससह तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत होती. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलसह सर्वच खूश होते. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने नाटकं सुरू झाली.
वादाची पहिली ठिणगी 91 व्या षटकात पडली. जेव्हा टीम इंडियाने चेंडू बदलण्याची मागणी केली. पंच यासाठी तयार झाले होते आणि फक्त 10.3 षटकात चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला गेला. पण बदललेल्या चेंडूवर वाद झाला. कारण या आधीचा चेंडू खूप जूना असल्याचं भारतीय संघाचं म्हणणं होतं. त्यामुळे गिल खूपच वैतागलेला दिसला. त्याने पंचांच्या हातून चेंडू घेतला आणि रागाच्या भरात दिसला. बराच काळ त्याच्या चेहऱ्यावर राग होता आणि काही वेळानंतर पंचांशी वाद देखील घातला.
पहिलं सत्र संपताना गिलच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आणि हसताना दिसला. पण असं होण्याचं कारण काय होतं? कारण तिथपर्यंत विकेट काही मिळाली नव्हती. तसेच एक मोठी भागीदारी होत होती. मग आनंदाचं कारण काय होतं? त्याला कारणही चेंडूच ठरला. कारण टीम इंडियाला मिळालेला चेंडू फक्त 8 षटकात बदलावा लागला. कारण त्याचा आकार बदलला होता. भारतीय संघाला मिळालेला हा तिसरा चेंडू होता. हा चेंडू चांगला होता आणि त्याला शाईन होती. त्यामुळे हा चेंडू मिळाल्याने गिल खूश होता.