Pune Railway Station Rename as Shrimant Bajirao Peshwa demand by BJP woman MP Medha Kulkarni
Marathi June 24, 2025 03:24 AM


भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव “श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे” असे करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

पुणे : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रेल्वे स्थानके किंवा शहरांच्या नामांतरणाची मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव प्रयागराज असे करण्यात आले. तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. त्याशिवाय, अहमदनगर जिल्ह्याचेही नाव बदलून त्याला अहिल्यानगर असे संबोधले जात आहे. पण आता एका भाजपा महिला खासदाराने पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. भाजपाच्या राज्यसभेतील महिला खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे. त्यांनी या रेल्वे स्थानकासाठी नाव सुद्धा सुचवले आहे. (Pune Railway Station Rename as Shrimant Bajirao Peshwa demand by BJP woman MP Medha Kulkarni)

भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव “श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे” असे करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. याचवेळी मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

हेही वाचा… Mumbai Local : मुंब्रा अपघातानंतर मुंबई लोकलबाबत रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे…

तसेच, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कोणताही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे, नावाजलेले आहे. ते राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत, म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केल्याचे खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील शनिवार वाडा आजही पेशवे घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळेच, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगत पुणे जंक्शनचे नामांतर करण्याची मागणी केल्याचेही यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे. पण त्यांनी केलेल्या या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात आला आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.