उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो नाग गजातून खाली पडल्याने झालेल्या आवाजाने कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. यामुळे चोराने पलायन केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कॅम्प क्रमांक ३ ओटी सेक्शनमध्ये महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर असलेला तांबा किंवा पितळेचा नाग २१ जूनला मध्यरात्री ३ वाजता एका चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. तो नाग काढून चोरट्याने मंदिराच्या ओट्यावर ठेवला आणि संरक्षक कठड्यावरून बाहेर जाण्याचा करत होता. मात्र, याच दरम्यान नाग खाली पडला आणि आवाज झाला. या आवाजाने कुत्री भुंकू लागल्याने चोरट्याला धातूचा नाग तिथेच सोडून पळून जावे लागले. सकाळी स्थानिकांना नाग बाहेर दिसल्यावर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. दरम्यान, या भागात रात्रीच्या वेळी नशेखोर तरुणांचा वावर वाढला असून, नशेच्या पैशासाठी हा नाग चोरण्याचा प्रयत्न झाला असावा, असा स्थानिकांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.