Israel-Iran War: युद्ध सुरु असूनही इस्रायलसह अनेक देशांच्या शेअर बाजारात तेजी; काय आहे कारण?
esakal June 24, 2025 04:45 PM

Israel-Iran war: अमेरिकेने इराणवरील अणु केंद्रांवर हल्ला केल्यानंतरही इस्रायलसह अनेक मध्यपूर्व देशांच्या शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. ही परिस्थिती आश्चर्यकारक वाटत असली, तरी त्यामागे काही कारणं आहेत.

इस्रायली शेअर बाजारात उच्चांक

रविवारी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायली शेअर बाजारात मोठी वाढ झाली. TA-125 निर्देशांक 1.8% वाढला आणि आठवड्याभरात त्यात 8% वाढ झाली. ब्लू चिप TA-35 निर्देशांकही 1.5% वाढला आहे. मागील आठवड्याभरात इस्रायलने इराणच्या अणुउद्योग व लष्करी केंद्रांवर हल्ले केले. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी केली.

कुवैत, ओमानमध्येही तेजी

मध्यपूर्वेतील इतर देशांच्या शेअर बाजारातही तेजी दिसून आली. कुवैतच्या Boursa Kuwait Premier Market Index मध्ये 1% ची वाढ झाली आणि तो 8650.6 या पातळीवर पोहोचला. ओमानमधील Muscat MSX30 निर्देशांक 0.50% वाढून 4525.31 वर होता.

शेअर बाजारातील तेजीचे कारण काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, अमेरिकेने इराणच्या प्रमुख अणु केंद्रांवर रात्रीच्या सुमारास मोठे हल्ले करून ती ठिकाणं उद्ध्वस्त केली. हे हल्ले 'बंकर बस्टर' बॉम्बच्या माध्यमातून करण्यात आले. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mizrahi Tefahot बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ रोनन मेनाखेम यांनी Reuters शी बोलताना सांगितलं की, "इराणच्या अणुउद्योगावर झालेले हल्ले हा मध्यपूर्वेतील सुरक्षा वाढण्याच्या दृष्टीने सकारात्मक टप्पा ठरू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे."

13 जून रोजी इस्रायलने इराणच्या अणु केंद्रं आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले केले. त्यानंतर इराणनेही रविवारी इस्रायलवर हल्ले केले. या हल्ल्यात तेल अवीव्हमध्ये मोठं नुकसान झालं आणि अनेक नागरिक जखमी झाले.

मेनाखेम म्हणतात, "मध्यम ते दीर्घकालीन विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती संधी ठरू शकते. विशेषतः सौदी-अमेरिका युती होण्याच्या शक्यतेमुळे बाजार सकारात्मक आहे."

युद्ध जरी सुरू असलं तरी गुंतवणूकदारांना वाटतं की आता इराणच्या अणुउद्योगाला मोठा झटका बसला आहे. यामुळे भविष्यातील धोका कमी होऊ शकतो, आणि सुरक्षा वाढल्यामुळे बाजाराला आधार मिळू शकतो. त्यामुळेच युद्धाच्या छायेखालीही शेअर बाजार तेजीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.