कल्पकतेबरोबरच हवे जबाबदारीचे भान!
esakal June 25, 2025 01:45 PM

- डॉ. मंजू हुंडेकर, संचालक - डेव्हलपमेंट सेल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

विविध पद्धतीचे कपडे परिधान करणं म्हणजे ‘फॅशन’ करणं असा ढोबळ समज अनेकांचा असतो. त्या पलीकडे ‘फॅशन’ या क्षेत्राकडे पाहिलं जात नाही. मात्र, फॅशनचा नवीन प्रवाह आणताना कल्पकतेपासून पर्यावरणापर्यंत अनेक घटकांचा अभ्यास करावा लागतो. आरामदायी, पर्यावरणपूरक आणि मन प्रसन्न करणारी नाविन्यता जपणं हे ‘फॅशन’ क्षेत्रातील तज्ज्ञांसमोरचं आव्हान असतं. या घटकांचं संतुलन न बिघडता नवनिर्मिती होणं अपेक्षित आहे.

आपल्या देशातील फॅशन क्षेत्राची सद्यःस्थिती काय आहे?

करिअरच्या इतर पर्यायांच्या तुलनेत ‘फॅशन एज्युकेशन’ आपल्या देशात खूप उशिरा आलं. त्यातही सुरुवातीला आपल्या देशाकडे केवळ उत्पादक म्हणून पाहिलं केलं. कापडाचं उत्पादन करण्यापलीकडे फार विचार त्याबाबत केला गेला नाही. त्यामुळे दीर्घ काळ हे क्षेत्र ‘अनऑर्गनाइज्ड’ राहिलं. हळूहळू आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण होऊ लागली.

१९८६ ला ‘निफ्ट’ (नॅशनल इन्स्टिट्यूट इन फॅशन टेक्नॉलॉजी) सेंटर आपल्या देशात सुरू झालं. ‘निफ्ट’चं एक केंद्र आम्ही १९९८मध्ये पुण्यात सुरू केलं. त्या वेळी १२०० जागांसाठी साधारण २५ हजार विद्यार्थी अर्ज करत होते. आजही अनेकांचा फॅशनकडे ओढा दिसतो. मात्र, इतरत्र कुठेही प्रवेश मिळत नाही म्हणून ‘फॅशन’कडे जाऊया आणि ‘फॅशन’ म्हणजे फक्त मुलींचा कोर्स हे गैरसमज बदलायला हवेत.

विद्यार्थ्यांच्या अंगी अंगभूत कौशल्ये असावीत?

‘फॅशन इन्स्टिट्यूट’ची संख्या वाढत असल्याने पटकन प्रवेश मिळतो असं वाटत असलं, तरी शेवटी गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही कसं शिकता? कुठे शिकता? काय शिकता? कोणते अनुभव घेता? हे फार महत्त्वाचं ठरतं. यावरच तुमचा या क्षेत्रातील पुढील प्रवास अवलंबून असतो. तुम्ही कुठेही शिकलात, तरी तुमची ‘क्रिएटिव्ह ॲबिलिटी’ महत्त्वाची असते.

ती तुम्ही अनुभवातून ‘शार्प’ करत राहणंही तेवढंच आवश्यक असतं. याच कल्पकतेला तुम्ही प्रात्याक्षिकाची जोड कशी देता? त्याचं ‘इंटरप्रिटेशन’ कसं करता? हेही महत्त्वाचं आहे. कापडाच्या प्रकारापासून त्याच्या पर्यावरणीय परिणामापर्यंत सर्व गोष्टींचा विचार करता यायला हवा. यात व्यावसायिक बाजू, बाजारपेठेची गरज हेदेखील जोखता यायला हवं.

नवोदितांना तुम्ही काय सांगाल?

नवीन काही तयार करताना ‘टूडी’ ते ‘थ्रीडी’ असा विचार करावा लागतो. याबरोबरच तुम्ही तयार केलेल्या ड्रेसचा समोरच्याच्या व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होईल? याचा विचार करा. त्यात शारीरिक आणि मानसिक या दोन्ही बाजूंचं भान असू द्या. एखाद्या मटेरिअलपासून प्रत्यक्ष वस्तू साकारणं ही प्रक्रिया समजून घेता यायला हवी. यात त्या गोष्टीचा आर्थिक विचार करणंही जमायला हवं. एखादा ड्रेस अनावश्यक महाग झाला आणि तो बाजारात चालला नाही, असं शक्यतो होऊ नये.

‘फॅशन’चा विचार करताना...

  • ‘फॅशन’ म्हणजे केवळ कपडे नाही. घरापासून राहणीमानापर्यंत असंख्य गोष्टी यात येतात.

  • संस्कृती जोपासतानाच तिला जगापुढे कसं ठेवता येईल? याचा विचार करा.

  • ग्राहकांची गरज, व्यक्तिमत्त्व आणि मानसिकतेचा विचार करून काम करा.

(शब्दांकन : मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.