Pune News : डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी; विविध संघटनांची मागणी
esakal June 26, 2025 04:45 AM

पुणे - पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहे. डॉ. कुलकर्णी यांची बदनामी थांबवून बॅनर लावणाऱ्यांवर कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

याबाबत ‘महाराष्ट्र ब्राह्मण सभे’च्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या घटवाई यांनी आयोगाकडे अर्ज केला होता. डॉ. कुलकर्णी यांची बदनामी करण्यासाठी शहरात बॅनर लावण्यात आले आहेत. याबाबत संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे.

डॉ. कुलकर्णी यांच्याबाबत झालेला प्रकार हा महिला वर्गाचा अपमान आहे, असे नमूद करत या प्रकाराविषयी सभेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ब्राह्मण समाजाची तसेच लोकप्रतिनिधींची बदनामी झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करवी, अशी मागणी ‘परशुराम हिंदू सेवा संघा’ने केली आहे. याबाबतचे निवेदन संघाकडून डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गिरिशा निंबाळकर यांना देण्यात आले आहे. एक महिला खासदार म्हणून तसेच ब्राह्मण समाजातील असल्याने त्याअनुषंगाने बदनामी करण्यात आली आहे.

याबरोबरच बाजीराव पेशवे, पेशवाईसंबंधी आणि ब्राह्मण समाजाची बदनामी होईल, अशा भाषेत बॅनर लावण्यात आले आहेत. याबाबत आपण लक्ष घालावे व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. संघाने या विकृतींचा तीव्र शब्दात निषेध देखील केला आहे.

चौकशी करून कार्यवाही करावी

राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले बॅनर लावण्याप्रकरणाची तत्काळ योग्य त्या नियमानुसार चौकशी करून कार्यवाही करावी. त्याच्या कार्यवाहीचा वस्तुस्थतीदर्शक अहवाल तत्काळ पाठविण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.