(Andhare on BJP) मुंबई : महिला पोलिसाचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे शहरातील भाजपाचा वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद कोंढरे याच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. कोंढरे हा भाजपाचा पुणे शहर महामंत्री असून त्याच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि 75 (1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare targets Fadnavis over molestation case in Pune)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोमवारी (23 जून 2025) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कसबा पोलीस ठाण्याच्या परिसरात भाजपाचे काही पदाधिकारी चहाच्या टपरीवर थांबले होते. तिथेच पीडित महिला पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होती. त्यावेळी प्रमोद कोंढरे हा तिथे आल्यानंतर त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्का दिला आणि तिच्याशी गैरवर्तन केला, असा आरोप आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याआधारे पोलिसांनी कोंढरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणात प्रमोद कोंढरे याला अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रमोद कोंढरे याने सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्याकडून कोणतेही गैरवर्तन तसेच हेतूपुरस्सर स्पर्श झाला नाही, असा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे. तर, प्रमोद कोंढरे याला भाजपाच्या पदावरून मुक्त करण्यात आल्याचे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ‘लाडक्या बहिणीच्या रक्षणाच्या बाता मारणारे’, असा उल्लेख करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. वर्दीतील महिला अधिकारीसुद्धा सुरक्षित नाहीत. संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या पीडितेला न्याय कसा देणार आहेत? प्रमोद कोंढरेची हकालपट्टी होणार की नाही? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
हेही वाचा – BJP in Pune : महिला पोलिसाच्या विनयभंगप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक; पुण्यातील घटनेने खळबळ