Drug trafficking continues in the Nashik city; 81 people arrested
Marathi June 26, 2025 09:25 PM


नाशिक शहरात चोरीछुपे गांजा, चरस, ड्रग्ज यासह अंमली द्रवपदार्थांची राजरोस विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे तरुणाईला नशेची चटक लागली आहे. नाशिक शहर पोलिसांनी सहा महिन्यांत ८१ जणांना अटक केली आहे. यामध्ये १५ लाख ४३ हजारांचा ३१४.५ ग्रॅम एमडी पावड जप्त करण्यात आली आहे. तर ३७ किलो गांजा, २८० किलो भांग जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे विक्रीचे रॅकेट उखडून टाकण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. (Drug trafficking continues in the Nashik city; 81 people arrested)

२०२३ च्या सुरुवातीला शहर पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदा अंमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस) कार्यान्वित झाले. या पथकाने गांजा, गुटखा, भांग तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अडीच वर्षांत या पथकाने सात टोळ्यांना गजाआड केले आहे. संशयित अंमली पदार्थांच्या व्यवसायात गुन्हेगारी विश्वातून पुढे सरसावल्याचे उघड झाले आहे. संदीप कर्णिक यांनी आयुक्तपदाची सूत्रे नोव्हेंबर २०२३ मध्ये हाती घेतल्यापासून पथकाला ‘फ्री हॅण्ड’ देण्यात आला. त्यानंतर पथकाने महिलांचा एमडी तस्करीत समावेश असलेल्या चार ते पाच टोळ्या उघड केल्या. युवराज पाटील या पोलीस अंमलदाराचाही एमडी तस्करीत सहभाग असल्याने निष्पन्न झाल्यावर त्याला संबंधित गुन्ह्यात सहसंशयित करुन शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानुसार तांत्रिक तपासाद्वारे संशयितांसोबत वारंवार बोलणारे, सोबत राहणारे, निकटवर्तींवर करडी नजर ठेवत त्यांचाही ‘ड्रग्ज’ तस्करीत सहभाग असल्यास कायदेशीर कारवाईची सूचना केली आहे. तसेच पथकाला सर्व संशयितांच्या ‘सीडीआर’चे तांत्रिक विश्लेषण करुन तस्करांची साखळी उघड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच संशयित आरोपींवर कारवाई होणार आहे.

पोलिसांना एमडीचे रॅकेट समूळ नष्ट करण्याचे आव्हान

अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून शहरात अजूनही एमडी ड्रग्जची चोरीछुप्या विक्री सुरुच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी एमडी ड्रगजचे रॅकेट उद्ध्वस्त करत परजिल्ह्यातील कारखानेही बंद पाडले. तरीही, नाशिक शहरात एमडी विक्रीवर अद्याप आळा बसू न शकल्याने पोलिसांसमोर एमडीचे रॅकेट समूळ नष्ट करण्याचे आव्हान आहे.

अवैध व्यवसायात पोलिसांचाही छुपा सहभाग

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमलीपदार्थाचा अवैध व्यवसायात पोलिसांचाही छुपा सहभाग आढळून आला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा हवालदार संशयित फरार आरोपी युवराज पाटील याच्याविरुद्ध बडतर्फची कारवाईतून दिला आहे. नाशिक शहर व परिसर ड्रग्जमुक्त व्हावा, यासाठी सातत्याने कारवायादेखील केल्या जात आहे. अधूनमधून विविध पान स्टॉल, कॅफेंचीही तपासणी करण्यात येते. जेणेकरून तरुणपिढी अमलीपदार्थांच्या व्यसनाधीन होणार नाही, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, शहरात आजही चोरीछुपे अंमली पदार्थांची विक्री सुरु आहे.

असा आहे जप्त केलेला मुद्देमाल
एमडी (मॅफेड्रॉन) : सन – गुन्हे – संशयित – मुद्देमाल – किंमत

२०२३ – ३ – ३४ – १५ किलो १७ ग्रॅम – १० कोटी ७३ लाख ४३ हजार ५०० रुपये,

२०२४ – ११ – २९ – ४४६.०५ ग्रॅम – २१ लाख दोन हजार २२० रुपये, २०२५ – १२ – २९ – ३१४.५ ग्रॅम – १५ लाख ४३ हजार रुपये

गांजा : २०२३ – ८ – १८ – १०७ किलो ८१५ ग्रॅम – १४ लाख २८ हजार ४६७ रुपये,

२०२४ – १६ – ३१ – २६८ किलो ५३९ ग्रॅम – ३८ लाख ७७ हजार ४४१ रुपये, २०२५ – ३ – ३ – ३७ किलो ११७ ग्रॅम – ६ लाख ४२ हजार ऐंशी रुपये.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.