जुनी सांगवीतील रस्ता रहदारीस धोकादायक
esakal June 29, 2025 03:45 AM

जुनी सांगवी, ता.२९ ः जुनी सांगवी येथील महादेव आळी ते संविधान चौकापर्यंतचा मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे आणि खोल खड्डे पडल्याने तो रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकदा हे खड्डे नजरेस येत नाहीत; तर काही वेळेस खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचे अपघात घडत आहेत.
या रस्त्यावरुन शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, चाकरमानी मंडळी, दुकानदार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच रिक्षा व दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. याच मार्गाने बसची प्रवासी वाहतूक होते. पुणे - औंध व इतर भागांत ये - जा करण्यासाठी रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. विशेषतः रात्रीच्यावेळी प्रकाशाच्या अभावामुळे खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पावसाळ्याआधीच येथील खड्डे दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र, स्थापत्य विभागाकडून रस्ते दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


या भागात बस प्रवासी थांबा, वेताळ महाराज मंदिर, रास्त भाव धान्य दुकान व मुख्य चौकातील बाजारपेठ असल्याने हा रस्ता नेहमी वर्दळीचा गजबजलेला असतो. येथील खड्डे दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यात यावीत.
- पराग ढोरे, नागरिक

मोठ्या पावसात रस्त्यावर पाणी साचते आणि खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे वाहने आदळून अपघात होण्याचा धोका आहे.
- श्रीधर ढोरे, नागरिक

प्रभागात अनेक ठिकाणी दुरुस्ती कामे सुरू आहेत. येथील खड्डे दुरुस्ती करण्यात येईल.
- प्रशांत कोटकर, अभियंता, स्थापत्य विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.