उल्हासनगर : उल्हासनगर काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली गटबाजी, नेतृत्वातील संभ्रम आणि कार्यकर्त्यांतील नाराजी अखेर शिंदे गटाच्या फायद्यात गेली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या, माजी उपमहापौर आणि प्रदेश महिला उपाध्यक्ष जया साधवानी यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत काँग्रेसचे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष मोहन साधवानी यांनीही पक्षांतर केल्याने काँग्रेसची शहरातील ताकद मोठ्या प्रमाणात खिळखिळी झाल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जया साधवानी यांनी अधिकृतरित्या शिवसेनेचा भगवा स्वीकारला. या प्रसंगी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी व स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रवक्ते किरण सोनवणे यांनी संकेत दिला की, येत्या काही दिवसांत काँग्रेससह अन्य पक्षांतील अनेक असंतुष्ट पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
जया साधवानी यांचा राजकीय प्रवासही लक्षणीय आहे. १९९१ साली उल्हासनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी यश मिळवले. त्यानंतर १९९७ मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विशेष म्हणजे २००३ साली केवळ ७ नगरसेवक असतानाही त्यांनी काँग्रेसकडून महत्त्वपूर्ण राजकीय डाव साधत महापौर आणि उपमहापौर पद मिळवले होते. त्या वेळी मालती करोतिया महापौर तर जया साधवानी उपमहापौर बनल्या होत्या.
Thane News: शहरात पुन्हा ‘टोइंगधाड’; बेशिस्त पार्किंगला लागणार ब्रेक, वाहतूक कोंडीवर पोलिसांचा अॅक्शन मोडमात्र गेल्या काही काळात काँग्रेसमधील गटबाजी, निर्णयक्षम नेतृत्वाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील वाढती नाराजी यामुळे साधवानी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्या पक्षापासून दुरावत गेल्या. अखेर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी आपला पुढील राजकीय प्रवास शिवसेनेतून करायचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे उल्हासनगर काँग्रेसची अडचण वाढली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भरती शिंदे गटासाठी बळकटी देणारी ठरण्याची शक्यता आहे.