Drown in Farmlake : पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यु; तर चुलत भाऊ सुखरूप
esakal July 01, 2025 05:45 AM

चित्तेपिंपळगांव - खोडेगाव, ता. छत्रपती संभाजीनगर येथे शेततळ्यात पडुन एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार ता. २९ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.

हर्षद रमेश वीर (वय-१५) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, हर्षद व सार्थक हे दोन भाऊ दुपारी शाळा सुटल्यानंतर आपल्या शेतात असलेल्या शेततळ्याजवळ शेळ्या चारत असताना हर्षदचा पाय चिखलात भरल्याने तो व त्याचा चुलत भाऊ सार्थक गणेश विर, (वय-११ वर्ष) हे दोघेजण त्यांच्याच शेतातील या शेततळ्यात पाय धुण्यासाठी गेले.

यावेळी हर्षदचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याच्यासोबत त्याचा भाऊही पडला. सार्थक शेततळ्यात सोडलेल्या दोरीच्या सहाय्याने वरती आला. मात्र, हर्षद हा पाण्याच्या खोलवर बुडाला व त्याला मात्र दोरीला पकडता आले नसल्याने तो शेततळ्यात बुडाला.

त्याचा भाऊ सार्थक हा शेततळ्यातुन कसाबसा वर आला व धावत पळत आरडाओरडा करत कुटुंबाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

हर्षद याला गावातील नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातुन बाहेर काढण्यात आले. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत्यू घोषित केले. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.