सहानुभूतीच्या आड लपलेला भेदभाव
esakal July 01, 2025 10:45 AM

- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सर अवेअरनेसचं काम करताना मला अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्रासाठी बोलावलं जातं. अशाच एका कार्यक्रमाला प्रेक्षकगण विविध वयोगटांतील महिला, काही रुग्ण आणि काही विद्यार्थ्यांची टीम होती. मी स्टेजवर गेले आणि अगदी हलक्याफुलक्या सुरात सुरुवात केली, ‘कॅन्सर म्हटलं की लोकांना वाटतं, आपलं आयुष्य कॅन्सल झालं! पण मी कॅन्सरची फोडणी थोडी वेगळी केली आहे – आय CAN, सर...(I CANcer!).’

सगळा हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. मी वैयक्तिक अनुभव बोलून दाखवायला सुरुवात केली. ‘दवाखान्याचा दरवाजा ‘अखेरचा’ नसतो’, तो ‘पुन्हा सुरुवात’ करणारा असतो, असं सांगितलं, तेव्हा वातावरणच बदललं.

कार्यक्रमाचा समारोप झाला, तेव्हा निवेदिका म्हणाल्या, ‘मला वाटलं होतं, की कॅन्सरचे पेशंट आपल्याकडे येणार म्हणजे शॉल पांघरलेले, थोडेसे थकलेले आणि कॅन्सर या विषयावर गंभीरपणे बोलणारे असावेत; पण मी तुम्हाला पाहिलं, तेव्हा जाणवलं, कॅन्सर पेशंटही प्रेझेंटेबल असतात! कधी कधी तर आपल्यापेक्षा जास्तच. खरंतर कॅन्सर पेशंट आणि इतर सामान्य व्यक्तींमध्ये काहीही फरक नसतो.’

कॅन्सर झाल्यावर लोकांमध्ये दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. पहिला प्रकार सशक्त साथ देणारा. ‘तू यातून नक्की बाहेर पडशील’, ‘तुझं बळ पाहून आम्हाला प्रेरणा मिळते’ असं सांगणारे. ही भावना समर्थनाची आणि विश्वासाची असते.

दुसरा प्रकार अधिक त्रासदायक असतो. ‘अगं बिचारी’, ‘किती दुःख आलं हिच्या वाट्याला’ असं म्हणणारे. यामध्ये आपुलकीपेक्षा दुरावा जास्त असतो. मग प्रश्न उभा राहतो, कधी कधी ही ‘दयाळूपणाची नजर’ हीच भेदभावाची सुरुवात नाही का?

कोणालाही सतत ‘बिचारा’ म्हणून बघितलं गेलं, तर त्या व्यक्तीला स्वतःबद्दलसुद्धा तसंच वाटू लागतं. रुग्ण असलो, तरी आमचं जग थांबत नाही. आमच्याकडे स्वप्नं आहेत, योजना आहेत, आणि हो - फॅशन, करिअर, हसणं, मजा करणं हेसुद्धा आहे! कॅन्सरग्रस्त व्यक्ती जॉबला जात असेल, कॉलेजला जात असेल, तर तिच्याकडे कौतुकाने बघा, ‘शाब्बास’ म्हणून पाठीवर थोपटून पुढे चला. ‘अरे बापरे, अजूनही कामाला जातेस तू?’ असं म्हणणं म्हणजे तिचा आत्मविश्वास कमी करणं आहे.

हो, काही क्षणांना त्या व्यक्तीला आधाराची गरज असते; पण तो आधार सामान मानून द्यायचा असतो, कमीपणा वाटू न देता. ती व्यक्ती केस नसतानाही स्कार्फ घालून आत्मविश्वासाने हसत असेल, तर तिच्या सौंदर्यावर थक्क व्हा, त्यावर दया करू नका. तिचं वजन कमी दिसत असलं, तरी तिच्या जिद्दीचा आदर करा, तिची ‘काया’ नव्हे आणि ती रडत असेल, तर तिच्या अश्रूंना ‘कमजोरी’ न समजता ‘सामर्थ्य’ समजा - कारण रडणं म्हणजे तुटणं नाही, ते मोकळं होणं आहे.

माझी शेवटची केमो झाल्यानंतर मी एक व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला, की मला कॅन्सर झाला होता, पण मी आता बरी आहे. सुरुवातीला कुणालाच ते खरं वाटलं नाही, कारण मी माझं दैनंदिन रूटिन सुरूच ठेवलं होतं. सोशल मीडियावर माझ्या पोस्ट्स नियमितपणे येत होत्या, आणि मी माझे फोटोही शेअर करत होते.

जेव्हा सगळ्यांना खरं कळलं, तेव्हा बरेच जण म्हणाले, ‘आम्हाला तुला घरी भेटायला यायचं आहे.’ पण मी प्रत्येकाला स्पष्ट सांगितलं, ‘मी आजारी नाहीये, आणि मला पेशंट समजून कोणीच ‘भेटायला’ येऊ नका. मीच तुम्हाला भेटायला येते – आपण कॅफेत भेटू, किंवा ऑफिसमध्ये भेटू.’

माझ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणींना मी स्वतःहून भेटले – कुणाला कॅफेमध्ये, कुणाला त्यांच्या घरी जाऊन, आणि कुणाला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. कारण मी माझ्या मनात एक ठाम केलं होतं, की मला काहीच झालेलं नाहीये. कारण भेदभाव म्हणजे केवळ स्पष्टपणे नाकारलं जाणं नसतं. तो कधी कधी खूप शांतपणे, प्रेमाच्या नावाखाली, दयाळूपणाच्या मुखवट्याखाली येतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच एवढे खंबीर उभं राहा, की लोक तुम्हाला कमजोर समजणार नाहीत.

कॅन्सर असलेली व्यक्ती ‘रुग्ण’ असते; पण ती फक्त रुग्ण नसते. ती मुलगी असते, बहीण असते, शिक्षिका असते, धावपटू असते, डान्सर असते, आंतरराष्ट्रीय व्याख्याता असते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक माणूस असते.. तिला ‘दया’ नको, तिला ‘मोकळेपणा’ हवा असतो.

तिला ‘हळवे शब्द’ नकोत, तिला ‘समान वागणूक’ हवी असते. कॅन्सर ही केवळ एक वैद्यकीय स्थिती आहे, व्यक्तिमत्त्व नव्हे. पेशंटपेक्षा प्रथम त्या व्यक्तीला ‘माणूस’ म्हणून बघा. तिच्या जिद्दीला सलाम करा- कारण ती हसतेय, चालतेय, लढतेय... आणि खरंतर – ती जिंकतेय!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.