पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज समजून घेऊया!
esakal July 01, 2025 11:45 AM

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज समजून घेऊया!

दाणोली वाचनालय ः शुक्रवारपर्यंत शाळांमध्ये व्याख्यानमाला


सावंतवाडी, ता. २९ ः दाणोली येथील साटम महाराज वाचनालयातर्फे ‘पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज समजून घेताना’ या व्याख्यानमालेला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. माडखोल केंद्रशाळा क्रमांक १ मध्ये आजचा कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी (ता. ४) पर्यंत विविध शाळांमध्ये ही व्याख्यानमाला होणार आहे.
सावंतवाडी संस्थानचे अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून चौकुळ, आंबोली, कोलगाव, कुणकेरी, दाणोली या पाच गावांतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये ही व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचे यावर्षीचे पाचवे वर्ष आहे. तरुण पिढीला वाचनाची सवय लागावी तसेच आपल्या संस्थानचे भूतपूर्व राजे यांची कर्तगारी व इतिहास कळावा तसेच ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना बापूसाहेब महाराज यांचे शैक्षणिक, सामाजिक, लष्करी सेवा, आरोग्य, जनतेबाबत कळवळा, प्रौढ साक्षरता, कृषी विषयक माहिती, संतांचे साहित्य, न्यायप्रियता व रामराज्य आदी चौफेर कार्य व सेवा तरुण पिढीला समजावे, या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी संस्थानचे अभ्यासक भरत गावडे या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी व्याख्यान असलेल्या गावातील माजी सैनिकांनाही विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला सावंतवाडी पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर यांच्या सौजन्याने बापूसाहेब महाराजांची प्रतिमा आणि त्यांच्या जीवनचरित्राचे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.
--------------
याठिकाणी होणार कार्यक्रम
मंगळवारी (ता. १) आंबोली युनियन इंग्लिश स्कूल, बुधवारी (ता. २) कोलगाव माध्यमिक विद्यालय, गुरुवारी (ता. ३) कोलगाव शाळा क्रमांक १ व या व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवारी (ता. ४) दाणोली बाजार शाळा येथे करण्यात येणार आहे. या व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, सचिव डॉ. लवू सावंत आणि सहसचिव गजानन गावडे यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.