पलावा उड्डाणपुलाची रखडपट्टी
मागील सात वर्षांपासून काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडीवर नवीन पूल उभारण्यात येत आहे. हा पूल थेट काटई चौकात उतरविण्यात येणार आहे. या पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. मागील सात वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. दरम्यान, पूल सुरू करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. चार ते पाच वेळा या पुलासाठी मुदत देण्यात आली होती. यामुळे या पुलाची कामे कधी पूर्ण होणार आणि तो वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
कल्याण-शिळ महामार्ग हा कल्याण, डोंबिवली आणि त्यापुढे ठाणे, नवी मुंबई, मुंबईशी जोडत असल्याने अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर सातत्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. कल्याण-शिळ रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे अर्धवट काम, मेट्रोचे सुरू असलेले काम, वाहनांची संख्या जास्त, काही ठिकाणी अरुंद रस्ते, पावसामुळे खराब झालेले रस्ते यामुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी होत आहे. पलावा चौकातदेखील वाहनांची मोठी कोंडी होत असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडी ते काटई नाका असा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.
पलावा जंक्शन येथे वाहने कोंडीत अडकू नयेत, यासाठी देसाई खाडीवरील हा पूल थेट काटई चौकात उतरवण्यात येणार आहे. दोन पुलांची उभारणी होणार आहे. यातील एका पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे सातत्याने या पुलाच्या कामाची पाहणी करीत आहेत. आमदार मोरे यांनी दोनदा म्हणजेच ३१ मे व जून अखेरीस या पूल खुला करण्याची मुदत जाहीर केली. मात्र ही मुदत उलटून गेली तरी पूल काही वाहतुकीसाठी खुला केलेला नाही.
उलट्या दिशेने प्रवास
पावसाचे कारण देत मुदत सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. सध्याच्या घडीला रेल्वे मार्गिकेवरील पलावा पुलावरून वाहनांची वर्दळ सुरू आहे. या पुलावरून जाणारी वाहने ही पलावा जंक्शन येथे उतरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय जुन्या पुलावर खड्डे पडले आहेत. तसेच वाहतूक कोंडी होत असल्याने दुचाकीस्वार नव्या पुलावरून उलट्या दिशेने प्रवास करतात. ज्या वाहनांना थेट ठाण्याच्या दिशेने जायचे असेल, पलावा येथे जायचे नसेल ती वाहने या नवीन पुलांचा वापर करू शकणार आहेत. यामुळे पलावा जंक्शन येथील कोंडी कमी होईल तसेच कल्याण-शिळ मार्गावरील काटई नाका व विको नाका येथे होणारी कोंडीदेखील काही अंशी कमी होईल, असे म्हटले जात आहे.
मुसळधार पावसाचे कारण
सात वर्षांपासून सुरू असलेल्या पलावा उड्डाणपुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. आमदार राजेश मोरे यांनी आमदार झाल्यानंतर या पुलाच्या कामाचा आढावा प्रत्यक्ष पुलावर जाऊन घेतला होता. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर ३१ मेपासून पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे जाहीर केले होते. दरम्यान, मुसळधार पावसाचे कारण दिलेली मुदत संपत आल्यावर जूनअखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. ही मुदतदेखील आता उलटून गेल्याने पूल नक्की खुला कधी होणार की पालिका निवडणुकांच्या तोंडावर पूल खुला केला जाणार, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
काटई चौकावर कोंडीचा भार
पलावा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पलावा जंक्शनवरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे. परंतु या कोंडीचा अतिरिक्त भार काटई चौक आणि निळजे चौकावर पडणार आहे. पलावा उड्डाणपुलाला पोहोच रस्ता नाही तसेच कल्याण-शिळ मार्गावर मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न इतक्यात सुटणार नाही.
आतापर्यंत देण्यात आलेली मुदत
जुलै २०२२
जानेवारी २०२३
डिसेंबर २०२३
३१ मे २०२५
३० जून २०२५