Maharashtra Live News Update : विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार कमी
Saam TV July 02, 2025 04:45 PM
मारेकरी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अन्यथा मी कठोर निर्णय घेणार-धनंजय देशमुख.

संतोष देशमुख खून प्रकरणाला 204 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप पर्यंत या खून प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला तात्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी आज जाहीर केलंय. तर आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे पक्ष चिन्ह असलेल्या गाड्या सुनावणी दिवशी कोर्टात मोठ्या संख्येने आणून वातावरण भयभीत करून कुटुंबावर दबाव आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचाही धनंजय देशमुख यांनी आरोप केला आहे.

Vidarbha: विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार कमी , साधारण पाऊस होईल

- मात्र 6 जुलै नंतर पावसाचा जोर वाढणार आणि चांगल्या आणि वादळी पावसाला होणार सुरवात

- जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज

- 6 जुलै च्या आसपास बंगाल च्या खाडीत एक सिस्टम बनण्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव विदर्भावर होऊन चांगला पाऊस होणार ...

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाची सुरूवात

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून शहरात मात्र पावसाची उघड झाप आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी आठवड्यात दुसऱ्यांदा पात्र बाहेर पडले आहे. पंचगंगा नदी क्षेत्रात असणाऱ्या 33 बंधाऱ्यांवर पाणी असल्यामुळे इथली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची संततधार असल्यामुळे धरण क्षेत्रात देखील वाढ होताना दिसत आहे. राधानगरी धरण सध्या 66 टक्के भरले आहे.

माजी सैनिकांना इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, चाकण येथे नोकरीची संधी

इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, चाकण, येथील अॅल्युमिनियम डाय कास्टिंग आणि मशीनिंग (उत्पादन) सुविधा केंद्रात काम करण्यासाठी १०० पेक्षा अधिक माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. माजी सैनिकांची नियुक्ती प्लांटमध्ये ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग, गेट कटिंग, ऑटोमेशन कंपोनेंट्सच्या फेटिंग मशीन शॉपसारख्या कामांमध्ये करण्यात येईल. ३० ते ४५ वर्षे वयाची अट असून, इयत्ता १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाली पटसंखेपेक्षा कमी पुस्तके

शासनाकडून यंदा सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं दिल्याचा दावा केला जात असताना वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत मात्र इयत्ता चवथीच्या विध्यार्थ्यांना पटसंखे पेक्षा कमी पुस्तकं मिळाले असून पुस्तकांचा एक संच दोन विद्यार्थ्यात वाटून दिला जात असल्याची तक्रार पालकांनी केलीये.

अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान

- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान

- तर बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

- उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हवालदिल

- कांद्याला ५०० रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

- चालू पावसाळी अधिवेशनात कांद्याला ५०० रुपये अनुदान जाहीर करण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

भरधाव मोटारसायकल उभ्या ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू

नवीन बायपास महामार्गावर कोरंभीजवळ रात्री भीषण अपघात घडला, भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. त्यात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सोनू केरु पालवे (२३) रा. गिरोला व मृणाल अशोक मानवटकर (२५) रा. जाखेगाव ता. मौदा, असे मृतकांची नावे आहेत.घटनेच्यावेळी नवीन बायपास महामार्गावर कोरंभी गावाजवळ ट्रक उभा होता. परिसरात काम केले जात होते. त्यामुळे महामार्गाच्या काही लेनवर बेरिकेट्स आढवे लावण्यात आले होते. रात्रीच्या दरम्यान मृतक हे दुचाकीने भरधाव जात असतांना बॅरिकेट्स पाळून उभ्या ट्रकला मागून जबर धडक दिली. दुचाकी अक्षरश ट्रकच्या चाकातच शिरली.दुचाकीवरील दोघेही जण या अपघातात जागीच मृत पावले.

SHIRDI भंडारदरा 60, निळवंडे धरण 50 टक्के भरले

मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला.. यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा या तिन्ही धरणांत नवीन पाण्याची आवकही वाढली असून भंडारदरा 60 टक्के, तर निळवंडे धरण 50 टक्के भरले आहे.. कळसूबाई शिखराच्या पर्वत रांगातही पावसाचा जोर वाढला असल्याने प्रवरेची उपनदी म्हणून समजल्या जाणाऱ्या कृष्णावंती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पावसाळ्यातच २० गावे टँकरच्या भरवशावर..! चाळीसगाव, अमळनेर व जामनेरला टँकरने पाणीपुरवठा

जळगाव जून संपला असतानाही काही भागात दमदार पावसाअभावी बळीराजा चिंतेत बुडाला आहे. तर दुसरीकडे पाणीटंचाई कमी होण्याचे नाव घेत नाही. सरलेल्या जून महिन्यातही २० गावांमध्ये २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. या टँकरची संख्या जामनेर, चाळीसगाव व अमळनेर तालुक्यात सर्वाधिक होती.

ग्रामीण भागामध्ये डिसेंबर २०२४ पासूनच पाणीटंचाई सुरू झाली आहे. ती आजही कायम आहे. यावेळी जूनमध्ये सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र मान्सूनची वाटचाल उशिराने झाली. त्यामुळे जूनच्या शेवटच्या काळातही पाणीटंचाई निर्माण झाली

लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात

मागच्या दोन आठवड्यापासून लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र,रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझिम सुरू झाली आहे., तर कवळ्या पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळालीय. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाच वातावरण पाहायला मिळत आहे. तर पुढील काही तास हवामान विभागाने लातूर जिल्हाला पावसाचा इशारा देखील दिला आहे.

गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा - शेख

कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात राणेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. राणेंनी मर्डर केल्या, भानगडी केल्या, माऱ्यामाऱ्या केल्या. त्यामुळेच ते एवढ्या उंचीवर पोचले असे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. गोगावले यांचे हे वक्तव्य म्हणजे कार्यकर्त्यांना गुन्हे करण्यासाठी चिथावणी देणारे आहे. समाजात यातून चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली. तसेच राणेंनी केलेल्या गुन्ह्याची गोगावलेंकडे माहीती आहे ती त्यांनी पोलीसांना द्यावी अशी मागणी ही इर्शाद शेख यांनी केली आहे.

सांगली.. वारणावती वसाहतीत अजगरांचं साम्राज्य. परिसरात भीतीचे वातावरण

सांगलीच्या चांदोली परिसरातील वारणावती वसाहत वन्य प्राण्यांचं आश्रयस्थान बनू लागली आहे. वारणा प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या साठी बांधलेली ही वसाहत सध्या अखेरची घटका मोजू लागली आहे. जीर्ण अवस्थेत झालेल्या मोकळ्या आणि पडक्या खोल्या. अवतीभवती वाढलेलं झाडाझुडपांचं साम्राज्य यामुळे गवे, बिबटे यांचे येथे वारंवार दर्शन होत आहे . यातच आता अजगराची भर पडली आहे. गेल्या वर्षभरापासून वारंवार या वसाहतीत अजगराचं दर्शन होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मणदूर मुक्कामी येणाऱ्या शिराळा मणदूर या बस समोरच परवा रात्री सव्वा नऊच्या सुमारास वारणावती येथे भला मोठा अजगर आला. चालकाने तात्काळ बस थांबून त्याचे चित्रीकरण केलं. संथ गतीने तो वारणा प्रकल्प कार्यालय परिसरातील झाडाझुडपात निघून गेला.

Maharashtra Live News Update : वाल्मीक कराडच्या जीवाला बीडच्या जिल्हा कारागरात धोका, नाशिकच्या कारागृहात हलवणार

आरोपी वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृह ऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांनी केली होती. बीडच्या जिल्हा कारागृहात गीते गॅंग आणि कराड गॅंग मध्ये झाला होता वाद.

प्रेयसीला मारण्यासाठी आणले पिस्तूल, पोलिसांनी केली अटक

प्रेमविवाहाला नकार दिल्याने प्रेयसीला संपविण्यासाठी थेट बिहारमधून पिस्तूल विकत आणणाऱ्या प्रियकराला मूल पोलिसांनी अटक केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे समोर आली. आरोपीकडून दोन जिवंत काडतुसे व एक देशी बनावटीच्या पिस्तूलसह १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गौरव नितीन नरुले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तोही आत्महत्या करणार होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी,दर मात्र स्थिर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर गाड्या कांद्याचे आवक होत आहे.शासनाने निर्यात शुल्क देखील हटवल, कांद्याची आवक देखील कमी असून कांद्याला योग्य दर मिळत नाही.सध्या कांद्याला सरासरी 1500 - 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.तर चांगल्या कांद्याला 2100 रुपये हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे.

पंढरपूरसाठी 23 एसटी गाड्या आरक्षित, उद्या होणार रवाना

लाखो वारकरी भाविक आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अनेक भाविक, वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जातात. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी विभागानेही गाड्यांचे नियोजन केले आहे. आत्तापर्यंत 23 एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. 3 जूनला रत्नागिरी सह विविध आघातून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहेत. अजून काही दिवस असल्याने भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने केले आहे.

मंडणगड आगारास 14 लाखांचा तोटा

सुट्टीचा आणि पर्यटनाचा हंगाम असूनही भारमान नसल्याने मंडणगड एसटी आगार मे महिन्यात 14 लाखांनी तोट्यात गेला आहे. ग्रामीण भागात 50 टक्केच भारमान मिळत असून वाहतुकीचा खर्च अधिक झाला आहे. परिणामी मंडणगड एसटी आगाराचे चाक कमी भारमानाच्या चिखलात रुतत आहे. मंडणगड आगारातून 48 एसटी बसच्या 197 फेऱ्या होतात। मे महिन्यात 14 हजार 500 किमी प्रतिदिन प्रवास होतो. मात्र सवलत मूल्यांसह 38% च भारमान राहिले आहे. प्रति किलोमीटर खर्च 57 रुपये अपेक्षित असल्यामुळे आगाराला तोटा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात इंधन आणि कर्मचारी असा 38 रुपये प्रति दिन खर्च होत असताना, तो 19 रुपये प्रति किमी भारमान राहत आहे. परिणमी आगार हे कमी भारमानामुळे तोट्यात येत आहे.

पुण्यात सर्दी, खोकल्याचा ताप वाढला, मुलांमधील संसर्गाच्या प्रमाणात वाढ

बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाले असून शाळेत मुले एकमेकांच्या सहवासात आल्याने सर्दी खोकला ताप जुलाब व अतिसाराच्या समस्या वाढल्या आहेत

प्रामुख्याने दोन ते दहा वयोगटातील मुलांमध्ये हे संसर्गाचे प्रमाण वाढले असून हे आजार जरी सामान्य असले तरी ते सहज पसरतात आणि लवकरात लवकर उपचार न केल्यास त्याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते यासाठी बालकांची काळजी घ्यावी असे आवाहन बालरोग तज्ञांनी केले आहे

बुलढाणा बंदला संमिश्र प्रतिसाद...

ईव्हीएम मशीनच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनात.. ओबीसी आधारित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.. बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.. या प्रमुख मागण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा ,राष्ट्रीय पिछडा वर्ग, बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात भारत बंदचे आव्हान करण्यात आले होते, बुलढाण्यात देखील भारत मुक्ती मोर्चा आणि इतर सामाजिक संघटनेच्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे निदर्शने करण्यात आली, तर बुलढाणा बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.. यावेळी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी पुण्यात

थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे शुक्रवारी (४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

प्रबोधिनीमध्ये सकाळी पावणेअकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, प्रबोधिनीचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Live News Update : यवतमाळला येलो अलर्टचा इशारा, 24 तासात बारा मीमी पाऊस

हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेतही कमी पाऊस बरसला आहे.मात्र जुलै महिन्यात मुबलक पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे महिन्याभरात आणखीन पाऊस नोंदवला जाणार आहे. तूर्त पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे.मात्र पावसाची उसंत मिळत असल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहे.

यवतमाळ विभागातील 725 अधिकारी कर्मचारी विठुरायाच्या सेवेत दाखल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांकडून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर स्पेशल यात्रा बसेस सोडल्या जाणार आहे.विठुरायाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री यांच्याकडून तीन दिवस चहा, नाश्ता आणि भोजन मोफत दिले जाणार आहे. यवतमाळ विभागातील 725 अधिकारी कर्मचारी पंधरा दिवस या सेवेत राहणार आहे. विशेष म्हणजे यवतमाळ आगारातून पंढरपूरसाठी 250 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 31 जुलै मुदत, शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य

खरीप हंगाम 2025-26 साठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी 31 जुलै 2025 पर्यंत विमा काढता येणार आहेत. तर पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ही पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलाय, दरम्यान या हंगामातील वेगवेगळ्या पिकांसाठी देण्यात येणारी विमा संरक्षित रक्कम देखील घोषित करण्यात आली आहे.

Beed : विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा आला समोर

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे असा आरोप या पालकांनी केला आहे. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा केला परंतु अद्याप कारवाई झालेली नाही आता पोलीस अधीक्षकाने आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे.

बदलापूरमध्ये स्कायवॉकच्या पायऱ्यांची दूरवस्था: अपघाताची भीती

बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दूरवस्था झालीय. त्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीय. या स्कायवॉकच्या अनेक पायऱ्यांवरील लाद्या तुटलेल्या आहेत. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचत असल्यानं प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे पाय घसरून अपघात होतायेत. त्यामुळे नगरपालिकेनं लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केलीय.

आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी 11 पूजार्यांची निवड

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्या शासकीय महापूजेचे मंत्र पठण व देवाचे उपचार करण्याचा मान मंदिरातील 11 पुजार्यांना मिळाला आहे. महापूजेच्या निमित्ताने पूजार्यांनी मंत्रोच्चाराचा सराव सुरू केला आहे. मंदिरातील मुख्य पुजारी संदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व 11 पुजारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजेचे पौराहित्य करणार आहेत. महापूजेवेळी सोवळे आणि उपरणे असा पोषाख परिधान करून हे सर्व पूजारी महापूजेच्या वेळी मंत्रोच्चार करणार आहेत.

लाखभर लोकसंख्येसाठी महावितरणचे अवघे 9 कर्मचारी

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागावर प्रचंड ताण येतोय. लाखभर लोकसंख्येसाठी अवघे 9 कर्मचारी अशी स्थिती आहे. त्यामुळे वीज वितरणाचा गाडा कसा हाकायचा हाच प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर पडलाय.

पंढरपुरचं विठ्ठल मंदिर सातशे वर्षांपूर्वीच्या मुळरूपात

पंढरपूर येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे मुळ रूप देण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणार्या भाविकांना विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे बदलेले रूपडे पाहायला मिळणार आहे.

राज्य सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन करण्यासाठी 73 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामधून हे काम सुरू आहे. विठ्ठल रूक्मिणी मातेचा गाभारा, चौखांबी,सोळखांबी,सभा मंडप आदी भागातील कामे पूर्ण झाली आहेत. या भागात नव्यानं विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत.

दिव्यांच्या प्रकाशामुळे मंदिरात प्रसन्नता वाढली आहे. मंदिरातील खांबावरील कोरीव मूर्ती,आणि नक्षी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे मंदिराचे आयुष्य वाढण्यास मदत झाली आहे.

बळीराजापुढं बनावट बियाण्यांचं संकट

राज्यात बळीराजापुढं बनावट बियाण्यांचं संकट उभ ठाकलंय.. खरीप हंगामात बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची मोठी फसवणूक होतं असल्याचे प्रकार समोर येत आहे.. अकोल्यातही बनावट बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक झालीय.. अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या अंबाशी येथे एका शेतकरी दांपत्यावर दुबार पेरणीच संकट ओढावलं आहे.. नंदकुमार आणि संगीता लाहोळे या शेतकरी दांपत्यानं 10 एकरात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली.. यासाठी त्यांनी अकोल्याच्या एका कृषी सेवा केंद्रावरून सोयाबीन आणि तुरीची बियाणं आणलं होत.. 21 जूनला शेतात पेरणी आटोपून गेली.. अनेक दिवस उलटले, पाऊस देखील चांगला झाला. मात्र, त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवल नाही..

जमीनीच्या वादातून परप्रांतीय महिलांकडून स्थानिक महीलांना मारहाण.

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांना जमीनीच्या वादातून मारहाण करण्यात आली आहे. जमीनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरात अहमदाबाद येथील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीने परप्रांतीय महिलांना आणून स्थानिक महीलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून समाज माध्यमांसमोर आणला आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.