‘ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला. शिवसेनेने मराठी माणसांच्या नावावर स्वतःचा उदरनिर्वाह केला, त्या मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला,’ असा आरोप खासदार नारायण राणे यांनी बुधवारी केला.
राज्यात सध्या मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मराठी भाषेसाठी एकत्र येण्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मंत्री नीतेश राणे यांच्या विधिमंडळाच्या मंत्री कार्यालयात भेट देण्यासाठी नारायण राणे आज आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांची बोलताना ते म्हणाले, ‘१९६० मध्ये मुंबईत ६० टक्के लोक मराठी होते. आता फक्त १८ टक्के मराठी लोक उरलेले आहेत.
याला जबाबदार कोण आहे? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना असे तुम्ही म्हणतात, मग गेली कुठे मराठी माणसे?’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात आले, असा आरोपही त्यांनी केला. त्यांना मुख्यमंत्रिपदाचेच महत्त्व नाही, अशी खोचक टीका राणे यांनी केली.
राज प्रमुख, उद्धव ठाकरे नगण्य
‘राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर जात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का?, हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घर आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावे हा व्यक्तिगत प्रश्न आह,’ असे नारायण राणे म्हणाले.
राज यांनी शिवसेनेत यावे, असे ते कधीच म्हणू शकत नाही. कारण तसे झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आले की ते प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य. ते नाही बोलावणार, असेही त्यांनी सांगितले.