बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणाला २०४ दिवस झाले. अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याच्याकडून कुटुंबीयांना धोका असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.
ता. नऊ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. वाल्मीक कराडने आवादा कंपनीला मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला अडसर ठरल्याने हत्या झाल्याचे एसआयटीच्या तपासातून पुढे आले असून वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि कृष्णा आंधळे यांच्यावर मकोकास विविध गुन्हे नोंद आहेत.
कृष्णा आंधळे फरार असून उर्वरित आरोपी कोठडीत आहेत. कृष्णा आंधळे फरार असल्याने त्याच्याकडून आमच्या जीविताला धोका असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
जेल प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून अटकेत असलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याने आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
Beed News : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वाऱ्यावर? हेल्मेटशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना २.६ लाखांचा दंड!न्यायालयात सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी, आरोपींचे समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येतात. कुठेतरी देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने आरोपींच्या समर्थकांकडून केला जात असल्याचा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला.