'सुंदर ते ध्यान' असो, की 'रुप पाहता लोचनी' हे संतवाङ्मयातील वर्णन असो. अभ्यासक असोत, की आजच्या आधुनिक युगातले वारकरी असोत, पंढरीचा विठोबा सर्वांना आकर्षित करत आला आहे.
शतकानुशतकं त्याच्या भेटीची आस महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना लागलेली दिसते.
पण पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती ही खरी मूर्ती नसून विठ्ठलाची मूळ मूर्ती दुसरीकडेच आहे, असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर? धक्का बसेल ना?
अगदी असाच काहीसा दावा 80 च्या दशकात करण्यात आला होता. या दाव्यामुळे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चर्चाविश्वात मोठी खळबळ माजली होती.
खरं तर, रुसलेल्या रखुमाईला शोधायला आलेला कृष्ण तब्बल 'अठ्ठावीस युगं' कटीवर हात ठेवून विठोबा अवतारात त्याच एका विटेवर आजतागायत उभा असल्याचं सांगितलं जातं. तशी मराठीजनांची श्रद्धा आहे.
मात्र, इतिहासातील दाखले असं सांगतात की, विठ्ठलाची हीच मूर्ती अनेकदा जागेवरुन हलवण्यात आली आहे आणि पुन्हा त्याच ठिकाणी प्रस्थापित करण्यात आली आहे.
विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल असे अनेक दावे-प्रतिदावे आजवर झालेले आहेत. त्यावरुन वादवितंडही झाला आहे.
पंढरपूरातील विठ्ठलमूर्ती खरी नसून माढ्यातील विठ्ठलमूर्ती खरी असल्याचा दावा तर प्रचंड गाजला होता. त्याबद्दलचा वाद-प्रतिवाद नेमका काय आहे?
विठ्ठलाच्या मूर्तीबद्दलचा हाच रंजक असा इतिहास आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी नाही? काय होता दावा?'सध्या पंढरपुरात असलेली मूर्ती ही खरी मूर्ती नसून सोलापूर जिल्ह्यातीलच माढे या गावातील विठ्ठल मंदिरात असलेली मूर्ती ही आद्यमूर्ती असण्याची शक्यता अधिक आहे,' असा दावा लोकसंस्कृतीचे प्रख्यात अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी केसरी या वृत्तपत्रात 15 आणि 16 फेब्रुवारी 1981 रोजी दोन सलग लेख लिहून केला होता.
हा दावा करताना त्यांनी 'पाद्म माहात्म्य' आणि 'स्कंद पुराण' ही पंढरपुराविषयीची दोन संस्कृत माहात्म्ये आधाराला ठेवली होती.
या दोन्ही 'पांडुरंग माहात्म्यां'मध्ये विठ्ठलाच्या मूर्तीविषयी एक अनन्यसाधारण असं वैशिष्ट्य नोंदवण्यात आलं आहे. ते म्हणजे, विठ्ठलाच्या मूर्तीच्या छातीवर एक 'षडक्षरी कूटमंत्र' कोरलेला आहे.
आद्यमूर्तीची निश्चिती करण्यासाठी हा निकष पूर्ण होणं गरजेचं आहे आणि सध्याच्या पंढरपूरातील मूर्तीच्या छातीवर हा मंत्र नसल्याने ती विठ्ठलाची मूळ मूर्ती नसावी, असं त्यांचं मत होतं.
रा. चिं. ढेरे आपल्या 'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय' या शोधग्रंथात म्हणतात की, "आज पंढरपूरच्या मंदिरात विराजमान झालेल्या मूर्तीच्या हृदयावर तर अशी अक्षरे मुळीच नाहीत. मग, अन्यत्र कोठे या प्रकारची आगळी मूर्ती अस्तित्वात आहे काय?"
पुढे, सोलापूर जिल्ह्यातीलच माढे गावातील विठ्ठल मंदिरातील मूर्तीवर असा मंत्र असल्याचा दावा करत ते म्हणतात की, "ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंतच्या सर्व श्रेष्ठ संतांनी जिच्या चरणांवर मस्तक टेकले होते आणि आपले बाहू उभारुन जिला उराउरी प्रीति पडिभराने खेव दिले होते, तशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळू शकते आहे."
खरं तर सुरुवातीला 'केसरी'मधील दोन लेखांमधून माढ्यातील मूर्तीच आद्यमूर्ती असावी, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर इतर काही अभ्यासकांनी त्या दाव्याचा प्रतिवाद केल्यानंतर माढ्यातील मूर्ती ही खरी नसली तरी किमान आद्यमूर्तीची खरी प्रतिमा असावी, असा दावा रा. चिं. ढेरे यांनी केला होता.
'माढ्याची मूर्तीच खरी' या दाव्याचा प्रतिवादसंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या या दाव्यामुळे अर्थातच संशोधक, वारकरी आणि सामान्य जनतेत सुद्धा खळबळ माजली होती.
मात्र, त्यांचा हा दावा खरा नसल्याचं सांगत तुकोबांचे वंशज आणि संतपरंपरेचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी प्रतिवाद केला होता.
त्यावेळी त्यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात यावर सविस्तर व्याख्यान दिलं होतं आणि सध्या पंढरपुरात असणारी विठ्ठलमूर्ती हीच आद्य विठ्ठलमूर्ती असल्याचं म्हटलं होतं. डॉ. सदानंद मोरे यांचं हे प्रतिवाद करणारं संशोधन जुलै 1984 मधील 'स्वराज्य' या साप्ताहिकातदेखील प्रसिद्ध झालं.
सदानंद मोरे यांच्या 'मंथन' या शोधलेखांच्या संग्रहात 'विठ्ठलाच्या आद्य मूर्तीचा शोध' नावाचा लेख आहे.
त्या लेखात सदानंद मोरे म्हणतात की, "डॉ. ढेरे यांनी आद्य मूर्तीच्या शोधात स्कंद पांडुरंग माहात्म्यातील विठ्ठल वर्णनावर भर दिलेला असून, या वर्णनातील वक्षःस्थळावरील मंत्र म्हणजे आद्य विठ्ठलमूर्तीचे अनन्यसाधारण लक्षण असे ते मानतात.
अशा प्रकारचा मंत्र असलेली मूर्ती सोलापूर जिल्ह्यातील माढे येथे आहे. तेव्हा तीच विठ्ठलाची आद्य मूर्ती असली पाहिजे, असे त्यांचे पूर्वी मत होते. (दै. कैसरी ता. 15 व 16 फेब्रु. 1981) 'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय' ग्रंथात त्यांनी हे मत बदललं आहे. परंतु वक्षःस्थळावरील मंत्र हे आद्य मूर्तीचे लक्षण हा त्यांचा सिद्धांत अद्याप कायम आहे. त्यांच्या आताच्या मांडणीनुसार माढ्याची मूर्ती आद्य नसून आद्य मूर्तीसारखी आहे आणि आद्य मूर्ती इ. स. 1873 पर्यंत पंढरपुरात विराजमान होती."
अफझलखान-औरंगजेबाची स्वारी आणि विठ्ठलमूर्तीचं स्थलांतररा. चिं. ढेरे यांनी आपल्या 'महासमन्वय' या शोधग्रंथात विठ्ठलमूर्ती हलवण्यात आल्या संदर्भात अनेक दावे केले आहेत.
त्यांनी म्हटलंय की, "पंढरपूरची विठ्ठलमूर्ती हलवून दुसरीकडे नेण्याचे संकटप्रसंग सुलतानी काळात अनेकदा कोसळले होते. संत भानुदासांच्या काळात कोणा विजयनगरच्या हिंदू राजाने मूर्ती स्वत:च्या राजधानीत नेल्याची आणि भानुदासाने ती परत आणल्याची कथा मराठी संतचरित्र ग्रंथात अेक ठिकाणी रंगवून सांगितलेली आहे." मात्र, या कथेच्या सत्यतेचा आणि त्याची खात्री करण्यासाठीची विश्वसनीय साधनं उपलब्ध नसल्याचंही ढेरे सांगतात.
मात्र, मुसलमानांच्या आक्रमणाच्या प्रसंगात मात्र विठ्ठलमूर्ती पंढरपुराबाहेर नेऊन ठेवावी लागल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत.
याबाबत रा. चिं. ढेरे म्हणतात की, "शके 1581 (इ.स. 1659) मध्ये अफझलखानाची स्वारी झाली असताना पंढरपुरावर संकट कोसळले होते. त्यानंतर शके 1617 (इ.स. 1695) पासून चार-पाच वर्षे औरंगजेबाची छावणी पंढरपुराजवळ ब्रह्मपुरी येथे होती.
त्या काळातही क्षेत्र आणि देव संकटात असल्याचे उल्लेख मिळतात. या दोन घटनांच्या मधल्या काळातही अनेकदा असे संकटप्रसंग उद्भवले होते आणि देवमूर्ती चिंचोली, गुळसरे, देगाव इत्यादी जवळच्या गावांत हलविली गेली होती. एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक (ब्लॅकमेलींग) केली होती."
संशोधक वि. का. राजवाडे यांनी विठ्ठलमूर्तीवरील संकटांची चर्चा करताना असं म्हटलं आहे की, "पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीला शके 1435 च्या मोठे गंडांतर शके 1581त अफझलखानाच्या हाते येण्याचा समय आला होता.
परंतु असे सांगतात, की बडव्यांनी ऐन वेळी मूर्ती पंढरपुराहून वीस मैल असलेल्या माढे गावी नेऊन ठेविली. पुढे अफझलखानाचा वध झाल्यावर ती मूर्ती परत आणिली व ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली."
या घटनेच्या स्मरणार्थ महादजी निंबाळकरांनी बांधलेल्या मंदिरात माढेकरांनी आद्य विठ्ठल मूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरे असलेली दुसरी मूर्ती बनविली, असं डॉ. ढेरे हे वि. का. राजवाडे यांच्या दाव्याच्या आधारे म्हणताना दिसतात.
राजवाडे यांच्या या दाव्याचा आधार घेऊनच पुढे रा. चिं ढेरे असा दावा करताना दिसतात की, 'माढेमधील विठ्ठलमंदिरात मूळच्या पुरातन मूर्तीची अथवा तंतोतंत तिच्यासारख्या मूर्तीचीच स्थापना श्रद्धेने करण्यात आली, असे मानावे लागते, हे उघड आहे.'
मात्र, अफझलखानाच्या स्वारीवेळी पंढरपुरात नेमकं काय घडलं, कसं घडलं, मूळ मूर्तीचं स्थलांतर कसं आणि कोणी केलं, माढ्यात नवं मंदिर बांधलं की जुन्या मंदिरातच मूर्ती ठेवली, नवं मंदिर बांधलं असेल तर तोपर्यंत ही मूळ मूर्ती कुठं ठेवली गेली, या सगळ्याच गोष्टी संशोधन करण्यासारख्या आहेत. त्यातले दावे माझ्याविरोधात गेले, तर मी ते स्वीकारेन, असंही ढेरे आपल्या 'महासमन्वय' ग्रंथात सांगतात.
पुढे ते आणखी एका घटनेचा उल्लेख करतात.
ते सांगतात की, "इ. स. 1873 मध्ये कोण्या माथेफिरूने मूर्तीवर धोंडा फेकला होता आणि त्या आघाताने मूर्तीचा एक पाय भंगला होता, अशी हकीकत समकालीन वृत्तपत्रांत छापून आली आहे आणि या घटनेवर त्या काळी पुष्कळ प्रकट चर्चा झालेली आहे." याच आघातानंतर मूळ मूर्ती बदलली गेली, असा दावा ते करतात.
कुण्या माथेफिरून धोंडा फेकल्याने मूर्तीचा एक पाय भंगला होता, ही घटना 20 जुलै 1873 रोजी घडली होती, याला सदानंद मोरेही दुजोरा देताना दिसतात. मात्र, म्हणून त्यानंतर मूळ मूर्ती बदलण्यात आली, हा दावा ते झिडकारताना दिसतात.
ते म्हणतात की, "ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर बडव्यांनी दोन-तीन दिवस मंदिर बंद ठेवले आणि मूर्तीच्या पायामध्ये लोखंडी किंवा तांब्याची पट्टी घालून ती सांधून घेतली आणि पाठीमागून गुडघ्यापर्यंत आधार, धीरा किंवा टेकू दिला; परंतु एकूण हा साराच प्रकार रहस्यमय वाटल्यामुळे बडव्यांनी मूर्तीच बदलली असा एक प्रवाद त्या काळात प्रचलित होता. गॅझिटियरकारांनी असे काही घडले नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. मूर्ती सांधली आणि बदलली अशी दोन मते प्रचलित असताना त्यातील एक स्वीकारण्यासाठी आणि दुसरा नाकारण्यासाठी जेवढा बळकट पुरावा द्यायला हवा तितका ढेरे देत नाहीत. ते फक्त मूर्ती बदलली एवढेच सांगतात."
कूटमंत्राचा निकषच खोटा असल्याचा प्रतिवादआद्यमूर्तीचा निकष ठरवण्यासाठी जो कूटमंत्र रा. चिं. ढेरे यांनी प्रमाण म्हणून आधारभूत मानला आहे, ते प्रमाणच सदानंद मोरे अमान्य करताना दिसतात. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भ दिलेले आहेत.
एकाही मराठी संताने या मंत्राचा उल्लेख आपल्या अभंगात केलेला नाही, हा मुद्दा मोरे पुढे आणतात. मूर्तीच्या छातीवरील वत्सलांछन, कौस्तुभमणी, वैजयंतीमाला अशा गोष्टींचा संत वारंवार उल्लेख करतात.
या सर्व गोष्टी त्यांच्या भावदृष्टीला बरोबर दिसाव्यात आणि नेमका मंत्रच दिसू नये असे का व्हावे? असा प्रतिसवाल ते करतात.
शिवाय, सावता माळींच्या एका अभंगात या कूटमंत्राचा उल्लेख असल्याचा संतसाहित्यातला एकमेव दाखला रा. चिं. ढेरे यांनी दिला आहे, त्या अभंगाच्या सत्यतेबाबतही सदानंद मोरे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात.
ज्या पद्म आणि स्कंद माहात्म्याचा उल्लेख करुन डॉ. ढेरे हा प्रवाद मांडतात, त्या माहात्म्यातील अध्याये प्रक्षिप्त असल्याची शक्यता पुढे करुन त्या महात्म्यातील सर्व माहिती जशीच्या तशी स्वीकारावी, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही ते म्हणतात.
स्कांद माहात्म्य ज्याप्रमाणे छातीवर मंत्रमाला असल्याचे सांगते; त्याप्रमाणे विठ्ठलाच्या हातात गदा व खड्ग असल्याचेही सांगते. मात्र, डॉ. ढेरे या गोष्टीचा मात्र चकार उल्लेख करीत नाहीत, असा प्रतिवादही मोरे यांनी केला आहे.
'त्यातील निकष सोयीने घ्यायचे ठरवले तर त्याला संशोधन म्हणता येणार नाही आणि असं संशोधन म्हणजे कल्पितांचा खेळ होऊन बसेल', असंही मोरे म्हणतात.
'माढे येथील विठ्ठलमूर्ती आद्य नाही' हे डॉ. ढेरे यांनी नंतर मान्य केलं आहे; परंतु तरीसुद्धा माढ्याची मूर्ती आद्य विठ्ठलमूर्तीची प्रतिकृती असल्याने ती समोर ठेवून म्हणजे प्रमाणभूत मानूनच आद्य मूर्तीचा शोध घ्यायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे.
यावर मोरे असा प्रतिवाद करतात की, "एका बाजूने डॉ. ढेरे माहात्म्यांमधील वर्णन प्रमाण मानून त्यानुसार आद्य मूर्तीवर संस्कृत कूटमंत्र असल्याचे सांगतात. दुसऱ्या बाजूने लोककथांवरून विठ्ठल हा मुळात धनगरांचा लोकदेव असल्याचे प्रतिपादन करतात.
आता विठ्ठल हा खरोखरच लोकदेव असेल तर त्याच्या छातीवर संस्कृत कूटश्लोक कसा काय आला? म्हणजेच ढेरे एकाचवेळी स्थळपुराणे आणि लोककथा या दोघांचेही साधन म्हणून उपयोग करीत आहेत.
तत्त्वतः त्यात गैर काहीच नाही. पण डॉ. ढेरे या दोन्ही साधनांना एकाच पातळीवरून वागवतात. इतकेच नव्हे तर सोयीनुसार कधी स्थळपुराणांचा तर कधी लोककथांचा उपयोग करत आहेत."
"भाषा, मिथकं आणि वस्तू यांच्यासंबंधीच्या अज्ञानातून तयार झालेल्या मूर्तीला प्रमाणभूत मानून तिच्या आधारे डॉ. ढेरे जो आद्य मूर्तीचा शोध लावायला निघाले आहेत, तो मृगजळाचा शोध आहे," असं म्हणत सदानंद मोरे यांनी त्यांचे दावे निकाली काढलेले दिसतात.
विठ्ठलाच्या वेगवेगळ्या मूर्ती आणि वेगवेगळी रुपंडॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेला दावा आणि डॉ. सदानंद मोरे यांनी केलेला प्रतिवाद आपण पाहिला. मात्र, विठ्ठलाबाबत आणखीही काही वाद-प्रवाद संशोधकांमध्ये दिसून येतात.
विठ्ठलाच्या मूळ मूर्तीबद्दल जसे दावे-प्रतिदावे आहेत, तसेच विठ्ठलाच्या मूळ रुपाबाबत सुद्धा आहेत.
विठ्ठल हा मूळचा बुद्ध आहे, जैन आहे, कृष्ण आहे, तो दक्षिणेतला देव आहे वा गवळी-धनगरांचा मूळचा लोकदेव आहे, असे वेगवेगळ्या स्वरुपाचे दावे आजवर करण्यात आले आहेत.
विठ्ठलाच्या वेगवेगळ्या रुपातल्या वेगवेगळ्या मूर्ती खासकरुन दक्षिणेतही अधिक प्रमाणात आढळतात.
अगदी तिरमलैचा बालाजी हा देव आणि आणि पंढरपुरातील विठ्ठल हा कधीकाळी एकच देव असावा आणि कालांतराने ते वेगवेगळ्या स्वरुपात विकसित झाल्याचाही दावा केला जातो.
अगदी कोल्हापुरातील पट्टणकोडोलीमध्येही 'विठ्ठल-बिरदेव' या जोडदेवतेचं मंदिर आहे.
याशिवाय, पश्चिम बिहारमध्ये कृष्णरुप मानला गेलेला, कटीवर हात ठेवून उभा असलेला अहिरांचा देव 'बीर कुअर' (वीर कुमार) हा देखील विठ्ठलाशी साधर्म्य साधताना दिसतो.
अहिल्यानगरमधील (पूर्वीचे अहमदनगर) टाकळीभान इथे रुक्मिणीसहित चार हातांचा आणि मिशांचा विठ्ठल दिसून येतो.
अशा वेगवेगळ्या रुपातील विठ्ठलाच्या छटा त्याच्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढवताना दिसतात.
-- यासंदर्भात तुम्हाला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर 'विठ्ठल नेमका कोण? बुद्ध, नेमिनाथ, लोकदेव की कृष्ण? लोकसंस्कृतीतले संदर्भ काय सांगतात?'हा 'बीबीसी मराठी'वर याआधी प्रकाशित झालेला लेख सुद्धा जरुर वाचा.
संदर्भ:
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)